Radio Station Hack: अमेरिकेत पुन्हा एकदा गंभीर सायबर सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश समजला जाणारे युनायटेड स्टेट्सही आता हॅकर्सपासून सुरक्षित राहिलेले नाही. देशातील अनेक रेडिओ स्टेशन्सवर हॅकर्सनी हल्ला चढवत बनावट आपत्कालीन सूचना आणि अश्लील सामग्री प्रसारित केली. यामुळे हजारो श्रोत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ने 26 नोव्हेंबर रोजी या संदर्भात तातडीचा इशारा जारी केला.
सायबर हल्ला कुठे घडला?
गेल्या आठवड्यात व्हर्जिनियातील NPR संलग्न WVTF आणि त्यानंतर ह्यूस्टनमधील ESPN 97.5 या दोन्ही स्टेशन्समध्ये सायबर हल्ला करण्यात आला. ह्यूस्टनमध्ये तर डॅलस काउबॉयजच्या लाईव्ह फुटबॉल गेमदरम्यानच हॅकर्सनी चक्क त्यांची सामग्री प्रसारित केली. दरम्यान, ह्यूस्टनमधील श्रोत्यांना लाईव्ह सामन्याऐवजी आक्षेपार्ह रेकॉर्डिंग, वर्णद्वेषी सामग्री आणि हॅकर्सचा सोशल मीडिया प्रचार ऐकावा लागला.
हॅकर्सनी EAS ‘अलर्ट सिग्नल’चा गैरफायदा घेतला
ही प्रणाली साधारणतः चक्रीवादळ, वादळ, भूकंप अशा आपत्कालीन परिस्थितींमध्ये चेतावणी देण्यासाठी वापरली जाते. परंतु याच सिग्नलचा गैरवापर करून हॅकर्सने रेडिओ लहरींवर कब्जा केला.
हेही वाचा – Honkong Fire Tragedy: हॉंगकॉंगमध्ये भीषण आग; मृतांची संख्या 44 वर, शेकडो जण बेपत्ता
उपकरणांतील त्रुटींमुळे हॅकिंग शक्य
स्विस कंपनी Barix च्या उपकरणांमधील सुरक्षा त्रुटींमुळे हा हल्ला शक्य झाल्याचे समोर आले आहे. हॅकर्सने स्टुडिओ-ट्रान्समीटर लिंक बदलून त्यात बनावट अलर्ट टोन, अश्लील भाषा आणि अयोग्य ऑडिओ प्रवाहित केला.
एफसीसीचा स्टेशन्सना इशारा
दरम्यान, एफसीसीने रेडिओ स्टेशनना त्वरित योग्य सुरक्षा उपाय लागू करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये डीफॉल्ट पासवर्ड बदलणे, सॉफ्टवेअर अपडेट्स त्वरित स्थापित करणे आणि शक्य असेल तेथे नेटवर्क फायरवॉल स्थापित करणे समाविष्ट आहे. स्टेशननी त्यांच्या उपकरणांच्या ऑडिट लॉगचे सतत निरीक्षण करावे, अशी सूचनाही FCC कडून देण्यात आली आहे. 2016 मधील अशाच हल्ल्यांनंतर Barix ने सुरक्षा सुधारण्याचे आश्वासन दिले होते, पण तरीही पुन्हा अशीच दुर्घटना घडल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.