IndiGo Flight Bomb Threat: लखनऊहून देशाची राजधानी दिल्लीकडे उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने आज विमानतळावर प्रचंड खळबळ उडाली. ही माहिती मिळताच विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली. धमकीचा हा निरोप मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा प्रोटोकॉल सक्रिय केला आणि संपूर्ण विमान व परिसराची कसून तपासणी सुरू केली. उड्डाणाच्या अगदी ऐनवेळी ही धमकी मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
उड्डाणाला उशीर
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाची तपासणी केल्यानंतर ही बॉम्बची धमकी केवळ एक अफवा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, या संपूर्ण तपास प्रक्रियेमुळे विमानाला दिल्लीसाठी रवाना होण्यास मोठा उशीर झाला. सुमारे 180 प्रवाशांना घेऊन जाणारे इंडिगोचे हे विमान सकाळी 10:45 वाजता लखनऊहून दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. परंतु, त्यापूर्वीच विमान कर्मचाऱ्यांना विमानामध्ये बॉम्ब असल्याचा संशयास्पद निरोप मिळाला होता.
इंडिगो एअरलाईन्सचे अधिकृत स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणावर इंडिगोच्या प्रवक्त्याने आपली अधिकृत बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले की, "12 जून 2026 रोजी लखनऊ ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या इंडिगोच्या 6E 2111 या विमानाला उड्डाणापूर्वी बॉम्बची धमकी मिळाली होती. निर्धारित सुरक्षा नियमांनुसार, आम्ही त्वरित सर्व संबंधित उच्च अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. आम्ही विमानतळावरील आवश्यक सुरक्षा तपासणीत पूर्ण सहकार्य करत आहोत. सुरक्षा यंत्रणांकडून हिरवा कंदील मिळताच हे विमान दिल्लीसाठी आपला पुढील प्रवास पूर्ण करेल."
हेही वाचा – Indian Railway : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; IRCTC ची नवी अत्याधुनिक वेबसाईट 15 जुलैपासून होणार सुरू
प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
एअरलाईन्सने पुढे बोलताना प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला. प्रवक्त्याने सांगितले की, "या अनपेक्षित विलंबामुळे ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना अल्पोपहार पुरवला जात असून, परिस्थितीची नियमित माहिती दिली जात आहे. नेहमीप्रमाणेच, आमचे प्रवासी, कर्मचारी आणि विमानाची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही."