Advisory for Ebola Virus: इबोला विषाणूजन्य आजारामुळे निर्माण झालेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘ॲक्शन मोड’ स्वीकारत देशभर कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) ने इबोला उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केल्यानंतर भारत सरकारने तातडीने आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना (advisory) जारी केली आहे. सर्व विमानतळे, बंदरे आणि अन्य प्रवेशद्वारांवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अनिवार्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे.
130 हून अधिक मृत्यू; आफ्रिकन देशांमध्ये संसर्गाचा फैलाव
मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील काँगो, युगांडा, सुदान, गिनी, लायबेरिया आणि सिएरा लिओन या देशांमध्ये इबोला संसर्गाचा प्रसार सुरू असल्याची नोंद आहे. आतापर्यंत 130 हून अधिक मृत्यू आणि सुमारे 500 संक्रमित रुग्णांची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार या देशांतून थेट किंवा ट्रान्झिटद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. विशेषतः काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमधून येणाऱ्या प्रवाशांवर अधिक काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लक्षणे आढळल्यास तातडीने माहिती देणे अनिवार्य
आरोग्य मार्गदर्शक सूचनांनुसार, बाधित देशांतून आलेल्या प्रवाशांमध्ये ताप, थकवा किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्यांनी विमानतळावरील हेल्प डेस्क किंवा आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनीही स्वतःहून आरोग्य यंत्रणेला माहिती देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत निष्काळजीपणामुळे इबोला विषाणूजन्य आजारामुळे चा प्रसार कोविड-19 सारखा वेगाने होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा – CJP X Account Banned: सोशल मीडियावर खळबळ! ‘कॉकरोच जनता पार्टी’चे X अकाऊंट अचानक गायब; नेमकं काय घडलं?
केंद्राची उच्चस्तरीय बैठक; राज्यांना SOP जारी
आतापर्यंत भारतात इबोला रुग्णाची नोंद झालेली नाही, ही दिलासादायक बाब असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. तरीही संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन सज्जतेचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) जारी करण्यात आली असून त्यामध्ये तपासणी, विलगीकरण, रुग्ण व्यवस्थापन, प्रयोगशाळा चाचणी आणि संदर्भ प्रणाली यांचा समावेश आहे.
DGHS (Directorate General of Health Services) issues passenger advisory regarding Ebola Virus pic.twitter.com/KI4BwX9UqP — ANI (@ANI) May 21, 2026
लक्षणे आणि धोका
इबोला विषाणूजन्य आजार हा प्राणीजन्य विषाणू असून तो अत्यंत घातक मानला जातो. याची प्रमुख लक्षणे म्हणजे ताप, तीव्र थकवा, डोकेदुखी, घसा खवखवणे, स्नायू व सांध्यांमध्ये वेदना, तसेच उलट्या व जुलाब. गंभीर अवस्थेत अंतर्गत व बाह्य रक्तस्त्राव होऊ शकतो, जो जीवघेणा ठरतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले आहे.