Uttarakhand Heavy Rain : उत्तराखंडमधील पर्वतीय जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे प्रसिद्ध चारधाम यात्रेला मोठा फटका बसला आहे. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सिरोबगड दरड प्रवण क्षेत्रात रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रांचे नवीन परवाने पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस येथे परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.
बद्रीनाथ महामार्ग ठप्प; सिरोबगड येथे पुन्हा संकट
या पावसाचा सर्वाधिक फटका श्रीनगर-रुद्रप्रयाग दरम्यानच्या प्रवासाला बसला आहे. सिरोबगड येथील डोंगरावरून अचानक प्रचंड प्रमाणात मातीचा ढिगारा आणि मोठे दगड खाली आल्याने बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे बंद करावा लागला आहे. गेल्या 3 दशकांपासून हा परिसर महामार्गावरील सर्वात मोठा अडथळा ठरत असून दरवर्षी पावसाळ्यात यामुळे चारधाम यात्रेचा वेग मंदावतो. सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेकडो वाहने अडकून पडली असून हजारो यात्रेकरू, पर्यटक, स्थानिक नागरिक आणि जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने मार्ग मोकळा होण्याची वाट पाहत आहेत. लगातार पडणारे दगड आणि ढिगाऱ्यामुळे रस्ता साफ करण्याच्या कामात यंत्रणांना अडचणी येत आहेत.
केदारनाथच्या पायी मार्गावरही ढिगारा; जिल्हाधिकारी हाय अलर्टवर
बद्रीनाथसोबतच केदारनाथ यात्रेला जोडणाऱ्या मार्गांवरही या पावसाचा विळखा पाहायला मिळत आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या गौरीकुंड येथील पायी मार्गावरही मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती आली आहे. यामध्ये एका रस्त्या कडेच्या दुकानाला फटका बसला असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ऋषिकेश-केदारनाथ महामार्गावरही अनेक ठिकाणी दगड आल्याने प्रवास करणे कठीण झाले आहे. या परिस्थितीवर बोलताना रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी विशाल मिश्रा यांनी संपूर्ण प्रशासन हाय अलर्टवर असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी प्रशासनाने जारी केलेले नियम:
– नागरिकांनी आणि भाविकांनी नद्या, नाले आणि हंगामी प्रवाहांजवळ जाणे टाळावे.
– सध्या तरी कोणताही अनावश्यक प्रवास करू नये.
– प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कडक पालन करावे.
हेही वाचा – IMD वेबसाईट डाऊन; पावसाची अद्ययावत माहिती मिळण्यात अडथळा, सर्व्हर क्रॅशची शक्यता
आदिकैलास आणि ओम पर्वत यात्रा तात्पुरती स्थगित
कुमाऊँ भागातील पिठोरगड जिल्हा प्रशासनाने हिमालयातील खराब हवामानाचा अंदाज घेऊन आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गांसाठी दिले जाणारे इनर लाईन परवाने देणे तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहे. पावसाळ्याची सुरुवात झाल्याने पर्वतांवर दरडी कोसळण्याचा आणि रस्ते वाहून जाण्याचा धोका वाढला असून प्रवाशांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे प्रशासनाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
उत्तराखंडमधील परवान्यांची आकडेवारी:
– 1 जुलै 2026 पर्यंत यात्रेसाठी 103 पासेस जारी करण्यात आले होते.
– या संपूर्ण वर्षात आतापर्यंत एकूण 52,441 इनर लाईन परवाने देण्यात आले आहेत.
हवामान विभागाने आधीच उत्तराखंडसाठी बुधवारपासून ते 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देत यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डोंगरावरून सातत्याने पडणाऱ्या दगडधोंड्यांमुळे रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी हवामानात सुधारणा होण्याची प्रतीक्षा सर्वजण करत आहेत.