Gnyanada Ramtirthakar : सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे सनई-चौघडे वाजत आहेत. अनेक कलाकार जोडीदाराची निवड करून आयुष्याची नवी इनिंग सुरू करत असतानाच, आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या घरीही लग्नाची लगबग सुरू झाली आहे. सोशल मीडियावर ज्ञानदाने शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, तिच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे.
मेहंदी आणि साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल?
ज्ञानदाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही ‘बिहाईंड द सीन’ व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये तिच्या हातावर सुंदर मेहंदी सजताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने स्पष्टपणे साखरपुडा होत असल्याचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, एका व्हिडिओत तिने एका मुलाच्या हातात हात दिलेला व्हिडिओ शेअर केला असला, तरी त्या ‘मिस्ट्री मॅन’चा चेहरा मात्र लपवून ठेवला आहे. “ठरलं… लवकरच कळवतो!” असं म्हणत तिने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
कोण आहे ज्ञानदाचा होणार पती?
व्हिडिओमध्ये ज्ञानदाच्या होणाऱ्या पतीचा चेहरा दिसत नसल्याने सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा मुलगा अभिनय क्षेत्रातील आहे की बाहेरील, हे गुपित अद्याप कायम आहे. ज्ञानदाने स्वतःहून हा सस्पेन्स ठेवल्यामुळे तिचे चाहते आता त्या खास व्यक्तीची ओळख पटण्याची वाट पाहत आहेत.
ज्ञानदाचा यशस्वी प्रवास
ज्ञानदाच्या कारकिर्दीचा आलेख अत्यंत प्रभावी राहिला आहे. ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेतून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ‘धुरळा’ चित्रपटामध्ये अमेय वाघ आणि सई ताम्हणकरसोबत तिने काम केले, तसेच ‘मुंबई लोकल’ या सिनेमातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पू (अपूर्वा वर्तक) या पात्राने तिला घराघरांत पोहोचवले. ही मालिका संपून दोन वर्षे झाली असली, तरी तिची ‘अप्पू’ची क्रेझ आजही कायम आहे. सध्या ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्या या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.