DA Hike: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील (DA) वाढीचा निर्णय लांबणीवर पडल्याने कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच या प्रक्रियेला इतका विलंब होत असल्याने, आता कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी उद्या रस्त्यावर उतरून निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत.
16 एप्रिल रोजी दुपारच्या सुट्टीत होणार निदर्शने
'कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्स' (CCGEW) ने या आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेने कॅबिनेट सचिवांना दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल 2026 रोजी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत (Lunch Break) देशभरातील सरकारी कार्यालयांबाहेर निदर्शने केली जातील. जरी हे आंदोलन अल्पकाळासाठी असले, तरी याद्वारे कर्मचारी आपली नाराजी आणि मागण्या ठामपणे सरकारसमोर मांडणार आहेत.
DA आणि DR च्या त्वरित घोषणेची मागणी
या देशव्यापी आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 'महागाई निवारण' (DR) यांची त्वरित घोषणा करणे हा आहे. या आंदोलनात आयकर विभाग, टपाल विभाग, कृषी विभाग तसेच 'बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया' आणि 'जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया' यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमधील कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
होळी उलटली तरी घोषणा नाही; कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य
साधारणपणे 7 व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यापासून महागाई भत्त्याची घोषणा वेळेवर केली जात असे. यंदा होळीच्या सणासुदीलाच ही आनंदाची बातमी मिळेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती. मात्र, एप्रिल महिन्याचा अर्धा काळ उलटून गेला तरी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या विलंबामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होत असून त्यांच्यामध्ये सरकारप्रती मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.