Android Scam Alert: जगभरातील स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी गुगलने तातडीचा इशारा दिला असून, सायबर गुन्हेगारांच्या नव्या युक्तीमुळे मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे उघड झाले आहे. गुगलच्या नुकत्याच जाहीर झालेल्या ‘बिहाइंड द स्क्रीन्स’ या सायबर सिक्युरिटी अहवालात एका अत्यंत धोकादायक स्कॅमबद्दल माहिती दिली आहे. हा स्कॅम विशेषतः अँड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करतो, परंतु आयफोन वापरकर्तेही धोक्याबाहेर नाहीत, असे गुगलने स्पष्ट केले आहे.
स्कॅम कसा होतो?
या नव्या पद्धतीला गुगलने “Bait-and-Wait Scam” असे नाव दिले आहे. या तंत्रात स्कॅमर्स प्रथम अनोळखी क्रमांकावरून साधा आणि निरुपद्रवी वाटणारा मजकूर संदेश पाठवतात. त्याची सुरुवात बहुतेक वेळा "तुम्ही मला ओळखलं का?" किंवा "तुम्ही कसे आहात?" अशा प्रश्नांनी होते. लोकांनी उत्तर दिले की, स्कॅमर हळूहळू संभाषण पुढे नेत विश्वास निर्माण करतात. काही दिवसांनंतर, ते वैयक्तिक माहिती, OTP, बँक तपशील, पेमेंट याची मागणी करू लागतात आणि अनेक लोक गाफील राहून या जाळ्यात अडकतात. गुगलने नमूद केले की ही स्कॅम पद्धत खूपच धीम्या आणि शिताफीने राबवली जाते, त्यामुळे लोकांना त्याचा संशयही येत नाही. गुगलने अशा टेक्स्ट मेसेजसाठी कडक सूचना दिल्या आहेत आणि वापरकर्त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा – SEBI : गुंतवणूक सल्लागार सेबीच्या रडारवर, 68 जणांची नोंदणी रद्द, जाणून घ्या नेमकं काय झालं?
स्कॅमचे दोन टप्पे –
आमिष दाखवले (Bait Phase):
स्कॅमर अनोळखी नंबरवरून संवाद सुरू करतात आणि हळूहळू जिव्हाळ्याची, मैत्रीपूर्ण भाषा वापरून बळीशी नातेसंबंध निर्माण करतात.
फसवणूक टप्पा (Attack Phase):
विश्वास मिळाल्यानंतर ते पैसे, वैयक्तिक माहिती, पासवर्ड, बँक डिटेल्स मागू लागतात. याच टप्प्यात मोठी आर्थिक फसवणूक घडते.
गुगलने सांगितलेले तीन सुवर्ण नियम (Golden Rules)
संभाषणाची गती कमी ठेवा
अनोळखी नंबरवरून मेसेज आला तर तात्काळ उत्तर देऊ नका. उत्तर देताना वेळ लावा आणि त्यांची भाषा, उद्देश समजून घ्या.
प्रश्नांची आणि संदेशातील माहितीची सत्यता तपासा
ते काय विचारत आहेत हे बारकाईने पहा. संभाषण अर्थपूर्ण वाटत नसेल तर लगेच चॅट बंद करा.
कोणतीही वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका
OTP, बँक माहिती, पासवर्ड, UPI PIN, क्रेडिट कार्ड माहिती मागितल्यास त्वरित ब्लॉक करा. गुगलच्या मते कोणतीही अधिकृत संस्था कधीही मेसेजद्वारे वैयक्तिक माहिती मागत नाही.
गुगलची सर्व मोबाइल वापरकर्त्यांना कडक सूचना
अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज डिलीट करा. “Do you remember me?” सारख्या संदेशांना प्रतिसाद देऊ नका. तसेच संशयास्पद मेसेज गुगल मॅसेजेसमध्ये ‘Report Spam’ करा. याशिवाय, फोनवरील सुरक्षा सेटिंग कायम अपडेट ठेवा.