Gold-Silver Price Today: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यानंतर आता खरेदीदारांचा कल पुन्हा वाढताना दिसत आहे. घसरलेल्या दरांचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी केलेल्या तुफान खरेदीमुळे आणि अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या बाजाराला भक्कम आधार मिळाला आहे. परिणामी, राजधानी दिल्लीसह देशभरात सलग 3 दिवस सोन्याच्या किमती उंचावल्या आहेत. या 3 दिवसांच्या कालावधीत 24-कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दरात 940 रुपयांची, तर 22-कॅरेट सोन्यामध्ये 860 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 229 रुपयांची वाढ होऊन दर 14,651 रुपये झाला आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे ताजे दर
आज दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव 1,44,380 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे, तर 22-कॅरेट सोन्यासाठी 1,32,360 आणि 18-कॅरेटसाठी 1,08,320 मोजावे लागत आहेत. मुंबई आणि कोलकाता या दोन्ही शहरांमध्ये सोन्याचे दर एकसारखेच असून तिथे 24-कॅरेट सोन्याचा दर 1,44,230, 22-कॅरेटचा दर 1,32,210 आणि 18-कॅरेट सोन्याचा दर 1,08,170 इतका नोंदवला गेला आहे.
हेही वाचा – Weather Update : मुंबईसह 10 जिल्ह्यांना पुढील काही तास महत्त्वाचे! पुण्याला रेड अलर्ट, तर कोकणात 24 तासांत…
चांदीच्या दरात घसरण; चेन्नईमध्ये चांदी सर्वाधिक महाग
दुसरीकडे, उद्योगांकडून होणारी मागणी मंदावल्यामुळे चांदीच्या दरावर दबाव दिसून येत आहे. 20 जुलै रोजी तब्बल 5,000 रुपयांची मोठी वाढ झाल्यानंतर आज चांदीच्या भावात प्रति किलो 100 रुपयांची घट झाली आहे. या घसरणीनंतर दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे प्रति किलो चांदीचा दर 2,34,900 वर आला आहे. मात्र, या सर्व प्रमुख शहरांच्या तुलनेत चेन्नईमध्ये चांदीचे दर उच्चांकावर असून तिथे एक किलो चांदीचा भाव 2,40,100 वर पोहोचला आहे.