CLAT 2026 Topper Geetali Gupta: क्लाट 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील 17 वर्षीय गीताली गुप्ता हिने या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित कायदा प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया रँक 1 पटकावली आहे. गीतालीने 119 पैकी 112.75 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. गीतालीने तिच्या यशाचे रहस्य सांगताना स्पष्ट केले की, तिने कधीही ठरावीक तास अभ्यास करण्यावर विश्वास ठेवला नाही. ती म्हणते, “मी दररोजसाठी अभ्यासाचे वेळापत्रक ठरवायचे आणि ते पूर्ण करायचे, हेच माझे तत्वज्ञान होते. परीक्षेच्या एक दिवस आधीही मी हेच पाळले.”
निकाल पाहून भावूक, व्हिडिओ व्हायरल
गीतालीचा निकाल पाहतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती घरातील मंदिरासमोर बसून रोल नंबर टाकत निकाल पाहताना दिसते. निकाल पाहताच तिला धक्का बसतो आणि ती भावूक होते. गीतालीला AIR 1 मिळण्याची अपेक्षा नव्हती, असे तिच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होते. तिच्या कुटुंबीयांनीही या यशाचा जल्लोष केला. दरम्यान, इंडियन एक्सप्रेसशी बोलताना गीतालीने सांगितले की, परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना तिला आत्मविश्वासापेक्षा शंका अधिक वाटत होती. “माझ्यासारखेच इतर अनेक विद्यार्थी पेपर खूप कठीण असल्याचे बोलत होते. त्यामुळे मलाही तो अवघड वाटू लागला. मात्र नंतर उत्तरांचे विश्लेषण करताना आत्मविश्वास वाढला,” असे ती म्हणाली.
AIR 1 मिळणे अविस्मरणीय अनुभव
तिच्या यशाबद्दल बोलताना गीताली म्हणाली, “ऑल इंडिया रँक 1 मिळणे ही खरोखरच अविस्मरणीय भावना आहे. परीक्षेची तयारी सुरू करताना कोणीही टॉपर होईल अशी अपेक्षा करत नाही.” गीताली सध्या इयत्ता 12 वी मानव्यशास्त्र शाखेत शिक्षण घेत असून राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि इंग्रजी हे विषय शिकत आहे. दहावीपासून नागरिकशास्त्र आणि सामाजिक शास्त्रात असलेली आवड तिला कायद्याकडे घेऊन गेली. मानव्यशास्त्र शाखेतील असूनही गीतालीला गणितात विशेष रस आहे, हे तिच्या प्रोफाइलचे वैशिष्ट्य आहे.
CLAT मध्ये क्वांटिटेटिव्ह टेक्निक ठरला मजबूत भाग
गणितातील आवडीचा थेट फायदा CLAT 2026 मध्ये झाला. क्वांटिटेटिव्ह टेक्निक हा तिचा सर्वात मजबूत विभाग ठरला. ‘मी गणितात चांगली असल्याने क्वांटमध्ये सहसा चांगले गुण मिळतात,’ असे गीतालीने सांगितले. शिस्तबद्ध नियोजन, विषयांवरील स्पष्ट पकड आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर गीताली गुप्ताने CLAT 2026 मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.