Philippines Emergency: फिलीपिन्समध्ये पुन्हा एकदा भीषण नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. देशात दशकातील सर्वात शक्तिशाली वादळ सुपर टायफून ‘फन-वोंग’ धडकले असून, यामुळे देशभरात हाहाकार माजला आहे. या वादळामुळे 10 लाखांहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले असून, अनेक ठिकाणी आपत्कालीन स्थिती (State of Emergency) जाहीर करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, फन-वोंग वादळ रविवारी संध्याकाळी ईशान्य भागातील अरोरा प्रांतात धडकले. वादळाच्या वेळी 185 किमी प्रतितास वेगाने वारे आणि काही ठिकाणी 230 किमी/ताशी वेगाने वारे वाहिले. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून, झाडे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
सरकारने तातडीने लष्कर, पोलीस आणि बचाव पथकांना उच्च सतर्कतेवर ठेवले आहे. PAGASA हवामान विभागाने जीवघेण्या परिस्थितीचा इशारा दिला असून, सिग्नल क्रमांक 5 म्हणजेच सर्वाधिक पातळीचा अलर्ट जारी केला आहे. राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी आणीबाणी जाहीर करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश दिले. संरक्षण सचिव गिल्बर्ट टिओडोरो ज्युनियर यांनी नागरिकांना शेवटच्या क्षणी धोका पत्करू नये, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा – Earthquake In Japan: जपानमध्ये 6.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी
सध्या 9 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, तर किनारपट्टीवरील अनेक गावांत चक्रीवादळाचे परिणाम दिसू लागले आहेत. आधीच्या टायफून कलमेगी मुळे देश अजून सावरलेलाच नाही आणि आता फन-वोंग च्या आगमनाने पुन्हा एकदा विध्वंसाची भीती वाढली आहे.