Rajasthan Tanker Fire: राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 68 वर बुधवारी, 18 मार्च 2026 रोजी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारा एक वेगातील टँकर उलटल्याने त्याला भीषण आग लागली, ज्यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. जैसलमेर-जामनगर महामार्गावरील ‘सिनवारा ओव्हरब्रिज’जवळ हा अपघात झाला. हा टँकर बाडमेरहून सांचोरच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. टँकर उलटताच त्यातील इंधन रस्त्यावर सांडले आणि काही क्षणांतच आगीचा प्रचंड भडका उडाला.
महामार्गावर आगीचे लोळ; वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर लागलेली आग इतकी भीषण होती की, तिचे लोळ महामार्गावर अनेक मीटर अंतरापर्यंत पसरले होते. टँकरमध्ये दोन व्यक्ती प्रवास करत होत्या, त्यापैकी दुर्दैवाने एकाला बाहेर पडता आले नाही आणि त्याचा आगीत मृत्यू झाला. दुसऱ्या व्यक्तीने प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. या आगीमुळे महामार्गाच्या एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत होते.
हेही वाचा – Russian Oil Tanker: भारताची रशियन तेलासाठी मोठी फिल्डिंग; चीनकडे जाणारी 7 जहाजे आता भारताच्या दिशेने रवाना
VIDEO | Jalore, Rajasthan: A diesel-filled tanker overturns on NH-68 in the Sanchore–Siwara area, triggering a fire. pic.twitter.com/2sUjeaDehV — Press Trust of India (@PTI_News) March 18, 2026
अग्निशमन दल आणि प्रशासनाकडून मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सांचोर येथून अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवून इतर वाहनांना सुरक्षित स्थळी वळवले आहे. सध्या आग विझवण्याचे काम पूर्ण झाले असून, पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.