FSSAI Raid: खाद्यपदार्थांत उंदराची विष्ठा अन् बुरशी… FSSAI ची उत्तर प्रदेश अन् महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांवर कारवाई

तपासणीदरम्यान या कंपन्यांच्या उत्पादन केंद्रांवर प्रचंड अस्वच्छता, जिवंत कीटक, बुरशी आणि उंदराची विष्ठा यांसारख्या गंभीर बाबी उघडकीस आल्या.

FSSAI Raid: खाद्यपदार्थांत उंदराची विष्ठा अन् बुरशी… FSSAI ची उत्तर प्रदेश अन् महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांवर कारवाई

FSSAI Raid: देशभरात अन्नसुरक्षेचे कडक निकष राबवणाऱ्या 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने (FSSAI) पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलले आहे. डाबर आणि फॉर्च्युनसारख्या नामांकित ब्रँड्सवर कारवाई केल्यानंतर, आता उत्तर प्रदेशातील 'व्हीकेसी नट्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि महाराष्ट्रातील 'छेदा स्पेशालिटीज फूड्स प्रायव्हेट लिमिटेड' या दोन कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान या कंपन्यांच्या उत्पादन केंद्रांवर प्रचंड अस्वच्छता, जिवंत कीटक, बुरशी आणि उंदराची विष्ठा यांसारख्या गंभीर बाबी उघडकीस आल्याने, सार्वजनिक आरोग्याचा विचार करून ही कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील 'व्हीकेसी नट्स'मध्ये धक्कादायक प्रकार

उत्तर प्रदेशातील 'व्हीकेसी नट्स'च्या युनिटमध्ये FSSAI च्या पथकाला साठवलेल्या पिस्त्यांमध्ये जिवंत कीटक, भिंतींवर काळी बुरशी आणि परिसरात उंदराची विष्ठा आढळून आली. एवढेच नव्हे तर गंजलेली यंत्रे, उघड्या क्रेट्सजवळ आणि अंजिराच्या साठ्याजवळ फिरणारी जिवंत पाल, तसेच हाताला पट्टी बांधून काम करणारे कर्मचारी अशा अत्यंत अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अन्नसुरक्षेच्या निकषांवर या युनिटला अवघे 38 टक्के अनुपालन गुण मिळाल्यामुळे FSSAI ने त्यांचा परवाना तात्काळ प्रभावाने अंशतः निलंबित केला आहे.

महाराष्ट्रातील 'छेदा स्पेशालिटीज'कडून नियमांची पायमल्ली

महाराष्ट्रातील 'छेदा या स्पेशालिटीज फूड्स'च्या युनिटमध्येही असेच गंभीर प्रकार समोर आले. तेथे कर्मचारी हातमोज्यांशिवाय बेसन मिसळत होते, तर कुजलेल्या कचऱ्याशेजारी जमिनीवर केळी सोल्ली जात होती. तेलाच्या टाक्यांभोवती बुरशी, साचलेले घाण पाणी आणि ओल्या जमिनीवर उघड्यावर ठेवलेला कच्चा माल यामुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा फज्जा उडाला होता. या युनिटला तपासणीत 42 टक्के अनुपालन गुण मिळाले. विशेष म्हणजे, यापूर्वीही या कंपनीचे काही अन्ननमुने असुरक्षित आणि चुकीचे लेबल असलेले आढळल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हेही वाचा – Pune Pub Raid: पुण्यात पहाटे 3 वाजता पबमध्ये सुरू होता धिंगाणा; पोलिसांची अचानक एन्ट्री, 62 जण ताब्यात

सुधारणा करेपर्यंत परवाने राहणार निलंबित

FSSAI ने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. 'छेदा स्पेशालिटीज फूड्स'ने सर्व त्रुटी दूर करून अन्नसुरक्षेच्या नियमांचे पूर्ण पालन करेपर्यंत त्यांचा परवाना निलंबितच राहील. तसेच 'व्हीकेसी नट्स'वरील अंशतः निलंबनाची कारवाई पुढील आदेश येईपर्यंत अशीच लागू राहणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number