Friday OTT Release : मार्च महिन्याचा पहिला शुक्रवार ओटीटी (OTT) प्रेमींसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी घेऊन आला आहे. या शुक्रवारी विविध प्लॅटफॉर्मवर 1 किंवा 2 नव्हे, तर तब्बल 15 चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. यामध्ये प्रभासच्या बहुचर्चित सिनेमापासून ते विजय सेतुपतीच्या सायलेंट फिल्मपर्यंत अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. प्रेक्षकांसाठी रोमान्स, क्राईम थ्रिलर, हॉरर आणि सामाजिक विषयांवरील कथांची मोठी रांग लागली आहे.
JioHotstar वरील महत्त्वाचे चित्रपट
या शुक्रवारी 'JioHotstar' वर काही बिग बजेट आणि संवेदनशील विषयांवरील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत:
द राजा साब (हिंदी): सुपरस्टार प्रभासचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट असून तो एका वारसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये संजय दत्त एका जादूगाराच्या, तर बोमन इराणी पॅरानॉर्मल एक्सपर्टच्या भूमिकेत आहेत.
चिरैया: दिव्या दत्ताची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट वैवाहिक बलात्कार आणि सामाजिक मौन यांसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करतो.
इतर: याशिवाय 'टेड सीजन 2' आणि साऊथ क्राईम थ्रिलर सीरिज 'विक्रम ऑन ड्युटी' देखील या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील.
Zee 5 आणि Sony Liv वरील मेजवानी
गांधी टॉक्स (Zee 5): विजय सेतुपती, अरविंद स्वामी आणि अदिती राव हैदरी यांची मुख्य भूमिका असलेली ही एक 'सायलेंट ब्लॅक कॉमेडी' फिल्म आहे, जी भ्रष्टाचार आणि लोभावर आधारित आहे.
जब खुली किताब (Zee 5): पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा हा रोमँटिक कॉमेडी-ड्रामा असून आयुष्याच्या उत्तरार्धातील प्रेमाची कथा यात मांडली आहे.
लालो (Sony Liv): 'लालो: कृष्ण सदा सहायताते' हा एक गुजराती आध्यात्मिक ड्रामा असून तो आत्मशोधाच्या प्रवासावर आधारित आहे.
हेही वाचा – Dhurandhar 2 Trailer: रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट; 'धुरंधर द रिव्हेंज'च्या ट्रेलरची तारीख ठरली
Netflix आणि इतर प्लॅटफॉर्म्स
Netflix: नेटफ्लिक्सवर 'द डायनासोर्स' ही 4 भागांची निसर्ग डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली आहे. सोबतच 'वॉर मशीन' ही सायन्स-फिक्शन ॲक्शन फिल्म आणि 'बॉयफ्रेंड ऑन डिमांड' ही रोमँटिक थ्रिलर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
SUN NXT: हॉरर प्रेमींसाठी 'ग्रॅनी' हा सुपरनॅचरल थ्रिलर उपलब्ध आहे. याशिवाय 'डियर राधी' आणि 'धीरम' हे चित्रपटही रिलीज झाले आहेत.
Lionsgate Play: तुरुंगातील दोन कैद्यांमधील नात्यावर भाष्य करणारी 'किस ऑफ द स्पायडर वुमन' ही कथा येथे पाहता येईल.
कौटुंबिक आणि बालकांसाठी मनोरंजन
केवळ मोठ्यांसाठीच नाही, तर मुलांसाठी 'हॅलो बच्चों' ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या 15 कलाकृतींमुळे प्रेक्षकांना घरबसल्या जागतिक दर्जाच्या सिनेमांचा आनंद घेता येणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही थ्रिलर, कॉमेडी किंवा सामाजिक ड्रामाची निवड करू शकता.