HDFC Bank New Chairman: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असणाऱ्या HDFC बँकेच्या अर्धवेळ अध्यक्षपदी (Part-time Chairman) माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवृत्त IAS अधिकारी राजीव कुमार यांच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अधिकृत मंजुरी दिली आहे. HDFC बँकेने 15 जुलै रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, राजीव कुमार यांचा हा कार्यकाळ पुढील 3 वर्षांसाठी असणार असून, त्यांची ही नियुक्ती 15 जुलै 2026 पासून तात्काळ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, केकी मिस्त्री हे बँकेचे 'नॉन-एक्झिक्युटिव्ह, नॉन-इंडिपेंडंट डायरेक्टर' (अकार्यकारी आणि बिगर-स्वतंत्र संचालक) म्हणून आपले काम यापुढेही पाहत राहतील, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
झारखंड केडरचे 1984 च्या बॅचचे माजी IAS अधिकारी असणाऱ्या राजीव कुमार यांचा प्रशासकीय आणि आर्थिक क्षेत्रातील अनुभव प्रचंड मोठा आहे. त्यांनी यापूर्वी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि केंद्रीय वित्त सचिव म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. विशेषतः, 2017 ते 2020 या कालावधीत 'डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस'चे (आर्थिक सेवा विभाग) सचिव असताना त्यांनी बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यांतच काळ्या पैशांविरुद्ध मोठी मोहीम उघडत सुमारे 3.38 लाख 'शेल कंपन्यांची' बँक खाती गोठवली होती. याशिवाय, देशातील अवैध पॉन्झी योजनांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ताळेबंद बळकट करण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली होती.
हेही वाचा – Semicon 2.0: 1.27 लाख कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार… मोदी सरकारकडून 'सेमिकॉन 2.0' योजनेला मंजुरी
अतानु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्ती
HDFC बँकेच्या संचालक मंडळाने 29 जून रोजी झालेल्या बैठकीत राजीव कुमार यांना अर्धवेळ अध्यक्ष आणि अतिरिक्त (स्वतंत्र) संचालक म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या मंजुरीच्या अवघ्या 3 दिवस आधी, एका बाह्य कायदेशीर तपासणी समितीने बँकेला माजी अध्यक्ष अतानु चक्रवर्ती यांनी केलेल्या सर्व आरोपांतून क्लीन चिट दिली होती. गुजरात केडरचे 1985 च्या बॅचचे माजी IAS अधिकारी असणाऱ्या अतानु चक्रवर्ती यांनी यंदाच्या मार्च महिन्यात आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला होता. बँकेतील काही कार्यपद्धती आपल्या नैतिक मूल्यांशी जुळणाऱ्या नसल्याचे त्यांनी राजीनामा देताना म्हटले होते.