Meher Castelino Passes Away: भारतीय फॅशन आणि सौंदर्यविश्वाला दिशा देणाऱ्या पहिल्या फेमिना मिस इंडिया तसेच ज्येष्ठ फॅशन पत्रकार मेहेर कॅस्टेलिनो यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने फॅशन पत्रकारिता आणि मिस इंडिया परंपरेतील एक महत्त्वपूर्ण पर्व संपले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा कार्ल, सून निशा आणि मुलगी क्रिस्टीना असा परिवार आहे. 1964 साली पहिल्यांदाच फेमिना मिस इंडियाचा मुकुट मिळवणाऱ्या मेहेर कॅस्टेलिनो यांनी केवळ सौंदर्यस्पर्धेपुरतेच मर्यादित न राहता भारतीय फॅशन पत्रकारितेला नवे व्यासपीठ मिळवून दिले. सौंदर्यविश्वातून लेखन क्षेत्रात प्रवेश करत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
दरम्यान, 1973 मध्ये ‘इव्हज वीकली’मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या लेखापासून त्यांचा पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ फॅशन पत्रकार आणि सिंडिकेटेड स्तंभलेखिका म्हणून काम करत आपले आयुष्य लेखणीला वाहिले. देश-विदेशातील सुमारे 160 प्रतिष्ठित प्रकाशनांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले असून, भारतीय वाचकांना जागतिक फॅशनचा दृष्टिकोन समजावून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
हेही वाचा – Oscar 2026 Homebound : 2026 च्या ऑस्करसाठी भारताकडून ‘होमबाऊंड’ची निवड
मेहेर कॅस्टेलिनो यांनी जर्मनी, फ्रान्स, इटली, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, तुर्की, नेदरलँड्स आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये आयोजित हॉट कॉउचर शो कव्हर केले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डिझायनर्सच्या मुलाखती घेत त्यांनी जागतिक फॅशन ट्रेंड भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. 2006 पासून त्यांनी लॅक्मे फॅशन वीकच्या अधिकृत फॅशन लेखिका म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे पत्रकारितेतील योगदान, कामावरील निष्ठा आणि प्रेमळ, उदार व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांना सहकाऱ्यांमध्ये विशेष मान होता. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांनी त्यांना मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान मानले.
मेहेर कॅस्टेलिनो यांच्या निधनाची माहिती फेमिना मिस इंडिया संस्थेने भावनिक सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. या पोस्टमध्ये त्यांनी मेहेर यांना एक खऱ्या अर्थाने अग्रणी व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवले असून, त्यांनी महिलांसाठी संधींचे नवे दरवाजे उघडल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या कृपा, प्रतिष्ठा आणि शांत सामर्थ्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिल्याचेही संस्थेने म्हटले आहे. भारतीय फॅशन विश्वात अमीट ठसा उमटवणाऱ्या मेहेर कॅस्टेलिनो यांचा वारसा त्यांच्या कार्यातून आणि त्यांनी प्रेरित केलेल्या स्वप्नांतून कायम जिवंत राहणार आहे.