Vikram Bhatt Arrested : प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता विक्रम भट्ट यांना आयव्हीएफ फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. राजस्थान आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भट्ट यांना मुंबईतील त्यांच्या मेहुणीच्या घरी ताब्यात घेतले. उदयपूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात जारी केलेल्या लूकआउट नोटीसमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
30 कोटींच्या फसवणुकीचा आरोप
उदयपूरमधील इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुरदिया यांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरुद्ध 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, भट्ट दाम्पत्याने 200 कोटी कमाईचे आमिष दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर सुमारे एक आठवडा आधी उदयपूर पोलिसांनी सर्व आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते आणि परदेश प्रवासास बंदी घातली होती.
काय आहे नेमकं प्रकरण?
पोलीस अहवालानुसार, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे मालक डॉ. मुरदिया हे त्यांच्या दिवंगत पत्नीवर आधारित बायोपिक चित्रपट तयार करण्याच्या तयारीत होते. यासाठी त्यांनी दिनेश कटारिया या उदयपूरमधील व्यक्तीची भेट घेतली. कटारियाच्या सल्ल्यानुसार 25 एप्रिल 2024 रोजी डॉ. मुरदिया मुंबईतील वृंदावन स्टुडिओत गेले, जिथे त्यांची भेट विक्रम भट्ट यांच्याशी झाली. बैठकीत भट्ट यांनी बायोपिकशी संबंधित सर्व काम स्वतः करणार असल्याचे सांगत रक्कम त्यांच्या फर्म VSBLLP (पत्नी श्वेतांबरी भट्ट यांच्या नावावर नोंदणीकृत) द्वारे देण्यास सांगितले. या प्रकल्पात भट्ट दाम्पत्याची मुलगी कृष्णा देखील सहभागी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू झाले, मात्र काम पुढे न सरकल्याने डॉ. मुरदिया यांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली.
विक्रम भट्ट यांना अटक केल्यानंतर राजस्थान पोलिसांनी वांद्रे कोर्टात ट्रान्झिट रिमांडची मागणी केली असून त्यांना पुढील चौकशीसाठी उदयपूरला नेण्यात येणार आहे. प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.