Home Loan Repayment : आजच्या काळात घरांच्या वाढत्या किमतींमुळे स्वतःचे हक्काचे घर घेणे सर्वसामान्यांसाठी एक मोठे आव्हान झाले आहे. निवासासाठी गृहकर्ज घेणे अनेकदा अपरिहार्य बनते. अनेक वर्षे मासिक हप्ते भरताना कर्जदारांना मानसिक आणि आर्थिक ताण येतो. मात्र, गृहकर्ज घेतानाच जर तुम्ही सुरुवातीला मोठी रक्कम (डाऊन पेमेंट) भरली, तर मुद्दल कमी झाल्यामुळे व्याजाचा मोठा बोजा आपोआप कमी होतो. यामुळे केवळ तुमची व्याजाची रक्कमच वाचत नाही, तर दरमहा भराव्या लागणाऱ्या हप्त्याचा भारही हलका होतो.
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वीची पूर्वतयारी
बँका सहसा तुमच्या एकूण वेतनाच्या 50 टक्क्यांपर्यंत हप्ता असलेले कर्ज मंजूर करू शकतात; पण त्यासाठी तुमचे आधीचे कोणतेही कर्ज थकीत नसावे. हल्ली कर्ज मिळणे सुलभ झाल्यामुळे अनेकांकडे विविध प्रकारची कर्जे असतात, ज्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे गुणोत्तर बिघडते. म्हणूनच गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपली इतर लहान-मोठी कर्जे पूर्णपणे फेडण्यावर भर द्यावा. असे केल्याने तुम्हाला अधिक रकमेचे कर्ज तर मिळतेच; शिवाय, बँका तुम्हाला किफायतशीर व्याजदराने कर्ज देण्यास तयार होतात.
वर्षाला एक अतिरिक्त हप्ता भरण्याचा फायदा
व्याजाचा डोंगर कमी करण्यासाठी दरवर्षी किमान एक अतिरिक्त मासिक हप्ता भरण्याचा स्वतःच तयार केलेला 'नियम' अत्यंत प्रभावी ठरतो. ही जास्तीची रक्कम थेट तुमच्या मुद्दलातून वजा केली जाते, ज्यामुळे व्याजाचे गणित वेगाने बदलते. जर तुम्ही नियमित हप्त्यांव्यतिरिक्त वर्षाला केवळ एक वाढीव हप्ता भरला, तर तुमचे 25 वर्षांचे कर्ज अवघ्या 20 वर्षांत संपू शकते. यासाठी वर्षभरात मिळणारी अतिरिक्त रक्कम किंवा बचतीचा वापर करणे हा एक शहाणपणाचा आर्थिक निर्णय ठरू शकतो.
हेही वाचा – Term Insurance Policy Duration : जीवन विमा मुदत योजना; नक्की किती वयापर्यंतचा विमा घेणे ठरते फायदेशीर?
कर्जाची पूर्व-देयके (Pre-payment) आणि त्याचे महत्त्व
गृहकर्जाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी 'पूर्व-देयके' म्हणजेच प्री-पेमेंट हा सर्वात सोपा मार्ग आहे. तुमच्याकडे जेव्हा जेव्हा जास्तीची बचत उपलब्ध असेल, तेव्हा ती रक्कम कर्जापोटी जमा करावी. ही रक्कम थेट मुद्दलाशी जोडली गेल्यामुळे उर्वरित काळातील व्याजाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते. ठराविक कालावधीनंतर अशी छोटी-मोठी पूर्व-देयके भरत राहिल्यामुळे कर्जाची एकूण मुदत तर कमी होतेच, पण भविष्यातील मासिक हप्त्यांची चिंताही मिटते.
एकरकमी मोठी रक्कम भरून कर्जमुक्ती
अनेकांना बोनस किंवा इतर मार्गानी मोठी रक्कम मिळते, अशा वेळी ती रक्कम उपभोग्य वस्तूंवर खर्च करण्याऐवजी कर्जाच्या खात्यात 'एकरकमी' जमा करावी. यालाच 'लमसम पेमेंट' असेही म्हणतात, ज्यामुळे व्याजासह मुद्दलाचा मोठा हिस्सा एकाच वेळी कमी होतो. ही पद्धत वापरल्यामुळे अनेक कर्जदार आपले कर्ज नियोजित वेळेच्या खूप आधीच बंद करू शकतात. योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक निर्णय घेतल्यास गृहकर्ज हे ओझे न वाटता घरमालक होण्याचा प्रवास सुखकर होऊ शकतो.
हेही वाचा – National Pension System: NPS नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल; आता 85 वर्षांपर्यंत राहणार निधीवर नियंत्रण