Snake Bite in Train: भारतीय रेल्वेसंदर्भात अत्यंत धक्क्दायक बातमी समोर येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचे मोठे दावे केले जात असतानाच थरारक आणि निष्काळजीपणाची घटना घडली आहे. डालटनगंज स्थानकावरून नवी दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसच्या वातानुकूलित (AC) कोचमध्ये एका महिला प्रवाशाला विषारी सापाने दंश केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मेदिनीनगर येथील रहिवासी असलेल्या रिमझिम सिंग या 3 जुलै रोजी रात्री या ट्रेनच्या G-12 या बोगीमधून प्रवास करण्यासाठी बसल्या होत्या. ट्रेन सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच त्यांच्या पायाला अचानक तीव्र आणि असह्य वेदना सुरू झाल्या, तसेच त्यांच्या अंगाला प्रचंड घाम सुटला. कोचमध्ये साप असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जंक्शनवर प्रवाशाला उतरवून रुग्णालयात धाव; प्रकृतीत सुधारणा
घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रेनमधील डॉक्टरांनी तातडीने महिलेची प्राथमिक तपासणी केली आणि त्यांना सर्पदंश झाल्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर पुढील उपचारासाठी गढवा रोड जंक्शनवर पीडित महिला आणि त्यांच्या मुलांना रेल्वेतून खाली उतरवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी तातडीने स्थानकावर धाव घेत रिमझिम सिंग यांना गढवा सदर रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मेदिनीनगर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांचा तीव्र संताप
पैसे देऊनही प्रवाशांना एसी कोचमध्ये सापाचा सामना करावा लागत असल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. रेल्वेचे कोच मेंटेनन्स, नियमित स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोलच्या दाव्यांची पोलखोल या घटनेमुळे झाली आहे. जर ट्रेनची नियमित साफसफाई आणि योग्य पेस्ट कंट्रोल केले जात असेल, तर थेट एसी डब्यात साप पोहोचलाच कसा? असा रोकडा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी लावून धरली आहे.