Elon Musk : 'ग्रोक' (Grok) एआय टूलच्या माध्यमातून तयार होणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराबाबत एलॉन मस्क यांनी आपली जबाबदारी नाकारली आहे. भारत सरकारने पाठवलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी 'X' वर एक सूचक उदाहरण दिले. त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने वाईट विचार कागदावर उतरवले तर तो लेखणीचा (Pen) दोष नसून ती हातात धरणाऱ्या व्यक्तीचा असतो. मस्क यांचे म्हणणे आहे की, 'ग्रोक' हे केवळ एक साधन आहे आणि त्याचा गैरवापर करणाऱ्या वापरकर्त्यावरच (User) त्याची सर्वस्वी जबाबदारी असेल.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) या प्रकरणाची गंभीर दखल घेत 'X' प्लॅटफॉर्मला 72 तासांचा कडक अल्टिमेटम दिला आहे. सरकारने या निर्धारित वेळेत एक सविस्तर 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' (ATR) सादर करण्याचे आदेश दिले असून, भारतीय कायद्यांचे आणि नैतिकतेचे उल्लंघन करणाऱ्या सर्व अश्लील पोस्ट, संबंधित युजर्स आणि अकाउंट्सवर त्वरित कारवाई करण्याची तंबी दिली आहे. योग्य पावले न उचलल्यास भारतीय कायद्यांतर्गत कायदेशीर खटल्याला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मंत्रालयाने 'X' ला दिला आहे.
हेही वाचा – केंद्र सरकारची एलॉन मस्क यांच्या 'X' प्लॅटफॉर्मला नोटीस, 'Grok AI' चा गैरवापर, कोणत्या प्रकरणात कारवाई?
'ग्रोक एआय'चा वापर करून महिलांचे अश्लील फोटो
राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या गंभीर विषयावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिल्यानंतर वादाला तोंड फुटले. 'ग्रोक एआय'चा वापर करून महिलांचे अश्लील डीपफेक फोटो बनवले जात असून ते बनावट खात्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महिलांची प्रतिष्ठा, गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षिततेचे हे उघड उल्लंघन असल्याचे सांगत अनेक लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.
मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये अवैध मजकूर तयार करणाऱ्या युजर्सना स्पष्ट इशारा दिला असून ते म्हणाले की, "जे कोणी बेकायदेशीर कंटेट बनवण्यासाठी 'ग्रोक'चा वापर करतील, त्यांना त्याचे तसेच परिणाम भोगावे लागतील जे बेकायदेशीर मजकूर अपलोड केल्यावर मिळतात." त्यांनी एक प्रकारे प्लॅटफॉर्मची तांत्रिक बाजू सुरक्षित असल्याचे सांगत युजरच्या कृतीवर बोट ठेवले आहे. मात्र, सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, सोशल मीडिया कंपन्यांनी अशी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे जी, असा मजकूर तयार होण्यालाच प्रतिबंध करेल.
भारत सरकार आणि 'X' मधील कायदेशीर संघर्ष अधिक तीव्र होणार?
सध्या संपूर्ण जगभरात एआय (AI) नियंत्रणाबाबत मोठी चर्चा सुरू असतानाच मस्क आणि भारत सरकारमधील हा पत्रव्यवहार समोर आला आहे. मस्क यांनी तंत्रज्ञान हे तटस्थ असून त्याच्या वापराची जबाबदारी युजरची आहे, असा दावा केला आहे. तर, भारत सरकारने सुरक्षित सोशल मीडिया वापरासाठी प्लॅटफॉर्मला जबाबदार धरले आहे. या परस्परविरोधी भूमिकांमुळे भविष्यात भारत सरकार आणि 'X' मधील कायदेशीर संघर्ष अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.