Elephant Rampage: केरळमधील अंगमाली आणि इरिंजालकुडा येथे शुक्रवारी मंदिरांमधील उत्सवादरम्यान हत्तींनी धुमाकूळ घातल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. या भीषण घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अंगमाली येथील किडांगूर महाविष्णू मंदिराच्या परिसरात ‘मय्यनाड पार्थसारथी’ नावाचा हत्ती अचानक हिंसक झाला. उत्सवासाठी आणलेला हा हत्ती अनियंत्रित झाल्याने परिसरात एकच घबराट उडाली आणि भाविकांची जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावपळ सुरू झाली.
हत्तीची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचा दुर्दैवी अंत
अंगमाली येथील घटनेत हत्तीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक विष्णू (वय 25-30 च्या दरम्यान, कोल्लम रहिवासी) याचा मृत्यू झाला. हत्तीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असताना हत्तीने त्याला पायदळी चिरडले. यामध्ये विष्णूचा जागीच मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, प्रदीप नावाचा माहुत जखमी झाला असून त्याला ‘लिटल फ्लॉवर हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले आहे. संतापलेल्या हत्तीने केवळ माणसांवरच नाही, तर तिथे पार्क केलेल्या गाड्यांवरही हल्ला केला. टीव्ही फुटेजमध्ये हत्ती एका कारला खेळण्यासारखे उलटताना आणि दुचाकींची नासधूस करताना दिसत होता.
दोन तासांच्या थरारानंतर हत्तीला केले बेशुद्ध
हत्ती भरवस्तीत शिरण्याची भीती असल्याने वनविभाग आणि ‘एलिफंट स्क्वॉड’ने तातडीने मोहीम हाती घेतली. जवळपास 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पशुवैद्यकांनी हत्तीला गुंगीचे इंजेक्शन (Tranquilizer Dart) दिले. सुरुवातीला हत्ती अधिकच बिथरला, मात्र हळूहळू औषधाचा परिणाम होऊन तो शांत झाला. त्यानंतर दोरखंड आणि साखळ्यांच्या साहाय्याने त्याला सुरक्षितरीत्या झाडाला बांधण्यात आले. विशेष म्हणजे, या हत्तीने यापूर्वी ‘त्रिशूर पूरम’ सारख्या मोठ्या उत्सवांमध्ये सहभाग घेतला होता आणि तो शांत स्वभावाचा मानला जात असे.
इरिंजालकुडा येथील दुसऱ्या घटनेत माहुताचा बळी
दुसरी घटना इरिंजालकुडा येथील श्री कूडलमाणिक्यम मंदिरात घडली. येथे एका हत्तीने चारा देण्यासाठी आलेल्या सहायक माहुतावर अचानक हल्ला करून त्याचा बळी घेतला. हा हत्ती आदल्या दिवसापासूनच काहीसा हिंसक झाला होता, त्यामुळे त्याला खांबाला बांधून ठेवण्यात आले होते. या हल्ल्यात मुख्य माहुतही जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मंदिर व्यवस्थापनाकडून (देवस्वम) सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास केला जात आहे.
#WATCH | Angamaly, Keralam | Mayyanad Parthasarathy, an elephant which was brought to Angamaly for a temple festival, ran amok near the Kidangoor Mahavishnu Temple, which resulted in the death of a man and damage to several vehicles. The elephant was tethered near the temple… pic.twitter.com/eOZ1FwKSeC — ANI (@ANI) May 1, 2026
उत्सवातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या दोन्ही घटनांमुळे मंदिरांमधील उत्सवांमध्ये हत्तींचा वापर आणि भाविकांची सुरक्षा यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हत्तींना उष्णता, गर्दी आणि आवाजाचा होणारा त्रास त्यांना हिंसक बनवण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रशासन आता या दोन्ही घटनांचा सखोल अहवाल तयार करत आहे.