ED Action against Uravashi Rautela, Yuvraj Singh, Sonu Sood, Robin Uthappa in Illegal Online Betting : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत मोठी कारवाई करत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची तब्बल 7.93 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईच्या रडारवर अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद, नेहा शर्मा, मिमी चक्रवर्ती आणि अंकुश हाजरा यांच्यासह माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा अशी मोठी नावे आहेत. विविध राज्यांमधील पोलिसांनी '1xBet' या बेकायदेशीर ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्मच्या ऑपरेटर्सविरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आला होता.
सरोगेट ब्रँडिंग आणि बेकायदेशीर प्रमोशन
ईडीच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, '1xBet' हा प्लॅटफॉर्म भारतात बेकायदेशीर ऑनलाइन जुगाराला प्रोत्साहन देण्यासाठी '1xBat' आणि '1xbat Sporting Lines' सारख्या सरोगेट ब्रँड्सचा वापर करत होता. या कंपन्यांकडे भारतात व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही परवाना नव्हता. तरीही, या सेलिब्रिटींनी सोशल मीडिया, ऑनलाइन व्हिडिओ आणि प्रिंट जाहिरातींच्या माध्यमातून या ब्रँड्सचे एंडोर्समेंट केले. धक्कादायक बाब म्हणजे, हे ब्रँड मूळतः बेटिंगशी संबंधित आहेत हे माहीत असतानाही, विदेशी कंपन्यांशी करार करून त्यांचे प्रमोशन करण्यात आले.
'लेयर्ड' व्यवहार आणि पैशांची अफरातफर
तपासादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना असे आढळले की, सेलिब्रिटींना देण्यात आलेले मानधन अत्यंत क्लिष्ट आणि 'लेयर्ड' व्यवहारांच्या माध्यमातून देण्यात आले होते. पैशांचा मूळ उगम लपवण्यासाठी आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी परकीय मध्यस्थांचा वापर करून हे पेमेंट करण्यात आले. बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंगला सुविधा पुरवणे आणि जनतेची दिशाभूल करणे या प्रक्रियेत या सेलिब्रिटींचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय ईडीने व्यक्त केला आहे, ज्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे.
यापूर्वीही झाली होती कारवाई
विशेष म्हणजे, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात मोठ्या नावांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 6 ऑक्टोबर 2025 रोजी ईडीने अशाच प्रकारच्या तपासांतर्गत माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांची 11.14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. आता युवराज सिंग आणि सोनू सूद यांच्यासह इतर सेलिब्रिटींच्या मालमत्तेवर झालेल्या या कारवाईमुळे मनोरंजन आणि क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाळ्यात ओढणाऱ्या अशा प्रवृत्तींविरुद्ध ईडीने आता आपला मोर्चा अधिक तीव्र केला आहे.
हेही वाचा – Gautami Patil : "जे बिग बॉसच्या घरात जातात त्यांच…" लोकप्रिय रिअॅलिटी शोबद्दल गौतमी पाटीलची प्रतिक्रिया