Sukma Encounter: सुकमा जिल्ह्यात रविवारी पहाटे सुरक्षा दलांनी केलेल्या नक्षलविरोधी कारवाईत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. बेज्जी आणि चिंतागुफा पोलीस स्टेशनच्या डोंगराळ परिसरात गस्तीदरम्यान ही चकमक झाली. डीआरजीच्या पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी तत्काळ प्रतिउत्तर दिले. कारवाईनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त करण्यात आली असून, सध्या संपूर्ण भागाची कसून तपासणी सुरू आहे.
एसपी चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांच्या हालचालींची गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरजीचे पथक नियमित गस्तीसाठी रवाना झाले होते. त्यावेळी झालेल्या चकमकीत तिघांचा मृत्यू झाला असून नक्षलविरोधी मोहीम अद्याप सुरू आहे.
हेही वाचा – Gwalior Car Accident: अति वेग जीवावर बेतला; Fortuner चा झाला चुराडा, पाच जणांचा जागीच मृत्यू
बिजापूरमध्येही मोठी कारवाई
यापूर्वी मंगळवारी बिजापूरमध्ये झालेल्या मोठ्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी राष्ट्रीय उद्यान परिसरात सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. डीआरजी विजापूर, डीआरजी दंतेवाडा आणि एसटीएफ यांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणावर स्फोटके, शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले होते.
हेही वाचा – Bihar Political Update : सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग; चिराग पासवान यांनी नितीश कुमारांची घेतली भेट
नक्षलविरोधी मोहिमेत 262 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमध्ये या वर्षी नक्षलविरोधी चकमकींमध्ये आतापर्यंत 262 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यापैकी 233 जणांना बस्तर विभागात, तर 27 जणांना गरियाबंद परिसरात संपवण्यात आलं. दुर्ग विभागातील मोहला-मानपूर-अंबागड चौकी परिसरातही दोन नक्षलवादी मारले गेले आहेत. सुकमातील आजची कारवाई ही सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण ऑपरेशन्सचा आणखी एक मोठा टप्पा ठरत असून, माओवाद्यांच्या हालचालींना मोठा आघात मानला जात आहे.