Salim Khan Health Update: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक 90 वर्षीय सलीम खान यांना प्रकृती बिघडल्यामुळे मंगळवारी सकाळी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू असतानाच, रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
नेमकी परिस्थिती काय होती?
लीलावती रुग्णालयातील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, ‘काल सकाळी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे फॅमिली फिजिशियन संदीप चोप्रा यांनी त्यांना आणले. तपासणी आणि औषधोपचारानंतर आम्हाला समजले की त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे. त्यांचा रक्तदाब जास्त होता, ज्यासाठी आम्ही त्यांच्यावर उपचार केले आणि काही तपासण्या करायच्या असल्याने आम्ही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. त्यांची प्रकृती बिघडू नये म्हणून व्हेंटिलेटर हा एक संरक्षक उपाय होता. काही वृत्तवाहिन्यांवर दाखवल्याप्रमाणे ते गंभीर नव्हते. आज आम्ही त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया केली आहे, जी डॉ. नीति डांगे यांनी केली.’
‘DSA’ प्रक्रिया यशस्वी
बुधवारी न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सलीम खान यांच्यावर DSA (Digital Subtraction Angiography) नावाची न्यूरोलॉजिकल प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. ही एक प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान प्रक्रिया आहे, ज्याद्वारे मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील अडथळे किंवा रक्तस्त्राव तपासला जातो. ही प्रक्रिया यशस्वी झाली असून खान यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. उद्यापर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवरून बाहेर काढले जाण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. वाढते वय लक्षात घेता बरे होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, असेही ते म्हणाले.
#WATCH | Mumbai, Maharashtra: On Salim Khan's health condition, Lilavati Hospital's Dr Jalil D Parkar says, "… Yesterday morning, he was admitted to Lilavati Hospital. He was brought in by his family physician, Sandeep Chopra. After the checkup and medication, we realised that… pic.twitter.com/GOb3pYjF36 — ANI (@ANI) February 18, 2026
रुग्णालयात कुटुंबीयांची धाव
सलीम खान यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी मिळताच अभिनेता सलमान खान याने तातडीने रुग्णालयात धाव घेतली. आपल्या वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर सलमान रुग्णालयातून बाहेर पडताना दिसला. खान परिवारातील इतर सदस्यही सध्या रुग्णालयात उपस्थित असून ते डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. सलीम खान हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव आहे. ‘सलीम-जावेद’ या जोडीने 1970 आणि 1980 च्या दशकात ‘शोले’, ‘दीवार’, ‘जंजीर’ आणि ‘त्रिशूल’ सारखे अजरामर चित्रपट दिले आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी सध्या संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.