India-Russia Relations: राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या आठवड्यात भारत दौरा केला. यादरम्यान, त्यांनी दोन्ही देशांमधील अनेक करारांवर स्वाक्षरी केली. भारतासाठी पुतिन यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. परंतु, आता रशियाबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारत दौऱ्यानंतर लगेचच रशियाने चीनसोबत संयुक्त लष्करी पातळीवर मोठी हालचाल केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. दोन्ही देशांनी जपान समुद्रात ‘तिसरा संयुक्त क्षेपणास्त्रविरोधी सराव’ पूर्ण केला असून, या सरावात शत्रूची क्षेपणास्त्रे पाडणे आणि प्रमुख क्षेपणास्त्र प्रतिष्ठानांचा नाश करणे याचा समावेश होता. ही कवायत पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यानच पार पडल्याने भारताने चिंता व्यक्त केली जात आहे. कारण भारत आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून सीमा विवाद आणि सामरिक स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे रशियाची चीनसोबतची वाढती जवळीक दक्षिण आशियातील सामरिक संतुलनावर परिणाम करू शकते, अशी भीची व्यक्त करण्यात येत आहे.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने काय म्हटलं?
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने उशिरा जाहीर केले की डिसेंबरच्या सुरुवातीला रशियन भूभागात हा तिसरा संयुक्त क्षेपणास्त्रविरोधी सराव करण्यात आला. मंत्रालयाने स्पष्ट केले की हा सराव कोणत्याही तृतीय देशाला लक्ष्य करून केलेला नाही आणि जगातील सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीशीही त्याचा संबंध नाही. यापूर्वीही दोन्ही देशांनी क्षेपणास्त्र संरक्षण, धोरणात्मक स्थिरता आणि पाणबुडीविरोधी कारवायांवर अनेक संयुक्त सराव केले आहेत.
रशिया-चीन भागीदारी
दरम्यान, रशिया आणि चीनने 2022 मध्ये, म्हणजे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाआधी, ‘नो लिमिट्स’ (मर्यादा नाही) धोरणात्मक भागीदारी जाहीर केली होती. त्यानंतर दोन्ही देश नियमित लष्करी सराव करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र ढाल प्रकल्प, आणि 30 वर्षांनंतर अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याच्या घोषणेने रशिया आणि चीन दोघेही अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते लष्करी समन्वय आणखी मजबूत करत आहेत.
भारताची वाढती चिंता
भारत आणि चीनमध्ये दशकांपासून तणावपूर्ण सीमावाद सुरू आहे. 1962 चे युद्ध, त्यानंतरची अधूनमधून होणारी चकमक, गलवान संघर्ष या सर्वांच्या पार्श्वभूमीवर चीनची वाढती लष्करी क्षमता भारतासाठी आव्हान निर्माण करू शकते. रशिया मात्र सांगत आहे की, चीनसोबतचे त्यांचे संबंध भारतावर परिणाम करणार नाहीत. पण वास्तव असे की भारताचे बहुतांश संरक्षण तंत्रज्ञान रशियावर अवलंबून आहे. रशिया-चीनची लष्करी जवळीक वाढली तर भारतासाठी भविष्यात राजनैतिक आणि सामरिक समीकरणे गुंतागुंतीची होऊ शकतात, असे विश्लेषकांचे मत आहे. पुतिन यांच्या भारत भेटीनंतर चीनसोबत क्षेपणास्त्रविरोधी सराव करणे हा रशियाचा सामरिक संदेश मानला जातो. हा सराव कोणालाच उद्देशून नाही, असे चीन सांगत असले तरी भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीचे महत्त्व अधिक आहे.