Highway Accident Car Crash : एका कार चालकाने घेतलेला चुकीचा निर्णय एका संपूर्ण कुटुंबासाठी काळ ठरला आहे. महामार्गावरून जात असताना अचानक एक्झिट चुकल्यामुळे चालकाने गाडी मागे (रिव्हर्स) घेण्यास सुरुवात केली. कार महामार्गाच्या बांधकामाधीन टप्प्यावरून मागे येत असतानाच, मागून प्रचंड वेगात येणाऱ्या एका स्कॉर्पिओ एसयूव्हीने (SUV) तिला जोरदार धडक दिली. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील हलगोया कटजवळ हा भीषण अपघात घडला असून, यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या थरारक अपघाताचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता समोर आले असून ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
गंगेत पवित्र स्नानासाठी जात असताना काळाचा घाला
दिल्ली-देहरादून द्रुतगती महामार्गावर हा भीषण अपघात घडला. हे दुर्दैवी कुटुंब हरियाणामधील बहादूरगड येथून हरिद्वारला जात होते. गंगेत पवित्र स्नान करणे आणि तिथल्या मंदिरांचे दर्शन घेणे हा या प्रवासाचा मुख्य उद्देश होता. मात्र, हलगोया कट ओलांडून पुढे गेलेली त्यांची कार अचानक मागे घेतली गेल्याने मागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज चुकला आणि हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये कुटुंबातील वेगवेगळ्या पिढ्यांमधील सदस्यांचा समावेश असून, या घटनेमुळे बहादूरगड परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.
अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
महामार्गावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांनुसार, दोन्ही वाहनांमधील धडक इतकी भीषण होती की ती कार काही मीटरपर्यंत फरफटत गेली आणि तिचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या जोरदार धडकेमुळे दुसरी वेगवान स्कॉर्पिओ गाडी देखील रस्त्यावर नियंत्रण सुटून उलटली. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये 40 वर्षांचे प्रवीण, त्यांची 37 वर्षांची पत्नी प्रीती, त्यांची वृद्ध आई सुदेश आणि अवघ्या 9 वर्षांचा लहानगा शिवांश यांचा समावेश आहे. या भीषण धडकेचा आवाज ऐकून महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीच्या ढिगाऱ्यातून जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.
दिल्ली–देहरादून एक्सप्रेस वे पर सहारनपुर (यूपी) में रोड एक्सीडेंट में 3 लोगों की मौत हो गई। Tiago कार बैक हो रही थी, तभी स्कॉर्पियो की टक्कर लग गई।@AmitGup96968797 pic.twitter.com/l4Q4I7y9Gv — Sachin Gupta (@Sachingupta) June 28, 2026
जखमींची अवस्था गंभीर; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
या अपघातात कारमधील इतर 3 सदस्य गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा दंडाधिकारी अरविंद कुमार चौहान आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी स्वतः जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली, तसेच डॉक्टरांना त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू
सध्या पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोन्ही वाहनांच्या पुढच्या आणि मागच्या भागाचे या अपघातात प्रचंड नुकसान झाले आहे. सहारनपूर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, अपघाताचे नेमके कारण आणि तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी घटनास्थळावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचे पोलिसांकडून बारकाईने विश्लेषण केले जात आहे. महामार्गावरील निष्काळजीपणा किती महाग पडू शकतो, हेच या अपघातावरून पुन्हा एकदा समोर आले आहे.