SIR Date Extended: मतदार यादी अधिक अचूक आणि शुद्ध करण्यासाठी सुरू असलेल्या Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या एसआयआरची अंतिम मुदत आयोगाने वाढवली असून नागरिकांना मतदार यादीत बदल, दुरुस्ती आणि नोंदणीसाठी आता अतिरिक्त सात दिवसांची संधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे बीएलओंनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या राज्यांना मिळाली मुदतवाढ?
ज्या भागांमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू आहे, त्या अंदमान–निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना ही वाढीव मुदत लागू होईल. निवडणूक आयोगानुसार, मतदार यादी अधिक अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ही मुदतवाढ आवश्यक होती.
4 डिसेंबरऐवजी अंतिम मुदत 11 डिसेंबरपर्यंत
पूर्वी एसआयआरची अंतिम तारीख 4 डिसेंबर होती. आता ती मुदत वाढवत 11 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना आणि बीएलोंना अधिक वेळ मिळणार आहे. एसआयआरचा मूलभूत उद्देश मतदार यादीतील बनावट, पुनरावृत्तीतील किंवा अस्तित्वात नसलेल्या नोंदी काढून टाकणे हा आहे. याच प्रक्रियेद्वारे बिहारमध्ये अलीकडेच झालेल्या पुनरावृत्तीत तब्बल 47 लाख बनावट नावे मतदार याद्यांतून काढण्यात आली होती.
The Election Commission of India has announced a revised Schedule, extending the relevant dates by one week for the ongoing Special Intensive Revision (SIR) of Electoral Rolls in 12 States/UTs, with 01.01.2026 as the qualifying date. pic.twitter.com/sJB7nHH7A6 — ANI (@ANI) November 30, 2025
एसआयआर फॉर्मची मुदत वाढवण्याचे कारण
अंतिम तारीख वाढवल्याने, नवीन मतदारांना नोंदणी करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. चुकीच्या किंवा डुप्लिकेट नोंदी काढून टाकणे आणि दुरुस्त करणे सोपे होईल. बीएलओ आणि अधिकाऱ्यांना क्षेत्रीय पडताळणी आणि सुनावणीसाठी अतिरिक्त वेळ मिळेल. या अतिरिक्त वेळेचा उद्देश अंतिम मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करणे हा आहे, जेणेकरून आगामी निवडणुकीत कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये.