CM Vijay Divorce Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री तथा TVK प्रमुख आणि दाक्षिणात्य अभिनेते थलपती विजय तसेच त्यांच्या पत्नी संगीता यांच्यातील वैवाहिक वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. संगीता यांनी चेंगल्पट्टू येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या हाय-प्रोफाइल प्रकरणावरून राजकीय आणि चित्रपट वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र, दोघांमध्ये झालेल्या समझोत्यामुळे 27 वर्षांचे नाते टिकून राहिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गंभीर आरोप आणि वैवाहिक वादाची पार्श्वभूमी
संगीता यांनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यायालयात याचिका दाखल केली होती. पतीचे एका अभिनेत्रीसोबत संबंध असल्याचा आरोप करत 2021 पासून यावरून मतभेद सुरू असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले होते. याशिवाय, कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर ठेवणे, आर्थिक निर्बंध लादणे आणि मानसिक त्रास देणे असे आरोपही विजय यांच्यावर करण्यात आले होते. सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळे आपल्याला आणि दोन्ही मुलांना – मुलगा जेसन संजय आणि मुलगी दिव्या साशा – यांना सामाजिक अपमानाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते.
संगीता यांचा परिचय: ग्लॅमरपासून दूर राहणारी व्यक्ती
25 August 1999 रोजी विजय यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या संगीता सोर्नालिंगम या मूळच्या श्रीलंकन तमिळ वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण युनायटेड किंगडममध्ये एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबात झाले. पती महानायक असूनही संगीता यांनी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहणे टाळले असून आपल्या कौटुंबिक आयुष्याला आणि दोन्ही मुलांच्या संगोपनाला प्राधान्य दिले आहे.
हेही वाचा – Devendra Fadanvis on Ramayana:'रामायण'ला ऑस्कर मिळाला नाही तर…; मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
एका चाहतीपासून जीवनसाथीपर्यंतचा अनोखा प्रवास
विजय आणि संगीता यांची भेट अत्यंत रंजक पद्धतीने झाली होती. सुरुवातीला संगीता या विजय यांच्या अभिनयाच्या प्रचंड चाहती होत्या. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याच्या इच्छेने त्या लंडनहून थेट चेन्नईत आल्या आणि चित्रपटाच्या सेटवर जाऊन त्यांनी विजय यांची भेट घेतली. या पहिल्या भेटीतून निर्माण झालेल्या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी एकत्र जीवन जगण्याचा निर्णय घेतला. आता कायदेशीर लढाई मागे घेतल्याने त्यांच्या नात्यातील कटुता संपून नवीन पर्व सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.