Delhi Police NHRC Complaint: राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे प्रकरण आता अधिक पेटले आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे वकील वीरेंद्र वरिष्ठ यांनी बुधवारी, 22 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) अधिकृत याचिका दाखल केली आहे. 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या हिंसक कारवाईची उच्चस्तरीय आणि तातडीने चौकशी करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
'साध्या वेशातील गुंडांकडून अल्पवयीन मुलींना मारहाण'; याचिकेत गंभीर आरोप
न्यायालयीन याचिकेत पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आंदोलनाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गरजेपेक्षा जास्त दडपशाही आणि बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गणवेशातील पोलिसांसोबत साध्या वेशातील काही अज्ञात व्यक्तींनी आंदोलक तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना अमानुषपणे झोडपून काढल्याचे याचिकेत नमूद आहे. वकील वीरेंद्र वरिष्ठ यांनी ही तक्रार ईमेल आणि प्रत्यक्ष प्रत पाठवून नोंदवली असून, मानवाधिकार आयोगाच्या अधिकृत प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
'संसद मोर्चा' दरम्यान दगडफेक अन् अश्रूधुराचा वापर
NEET पेपरफुटीविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) बॅनरखाली गेल्या 1 महिन्यापासून आंदोलन पेटले आहे. यातच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे तब्बल 25 दिवस उपोषणाला बसले होते, ज्यांना 18 जुलै रोजी पोलिसांनी बळजबरीने उचलून रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या कारवाईच्या निषेधार्थ आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी संसदेकडे कूच केले. या मोर्चादरम्यान जमावाकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले.