Delhi Blast Update: लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटानंतर दिल्ली सरकारने तत्काळ आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या, जखमी आणि गंभीर जखमी नागरिकांसाठी सरकारने भरपाई निश्चित केली आहे. रेखा गुप्ता यांनी आपल्या एक्स हँडलवर वर लिहिले, “दिल्लीतील दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या कठीण काळात सरकार प्रत्येक बाधित कुटुंबासोबत ठामपणे उभे आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख, कायम अपंगत्व आलेल्यांना 5 लाख आणि गंभीर जखमींना 2 लाखांची भरपाई देण्यात येईल. तसेच सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च दिल्ली सरकार उचलेल. मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या, दिल्लीची शांतता आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रशासन परिश्रमपूर्वक कार्यरत असून सर्व बाधित कुटुंबांना मदतीचा हात देत आहे.
दिल्ली में हुई दुर्भाग्यपूर्ण घटना ने पूरे शहर को स्तब्ध कर दिया है। इस मुश्किल की घड़ी में दिल्ली सरकार की गहरी संवेदनाएँ उन सभी परिवारों के साथ हैं जिन्होंने अपने प्रियजनों को खोया है और जो इस घटना में घायल हुए हैं। दिल्ली सरकार हर पीड़ित परिवार के साथ मज़बूती से खड़ी है और… — Rekha Gupta (@gupta_rekha) November 11, 2025
लाल किला मेट्रो स्टेशन तात्पुरते बंद
दरम्यान, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने सुरक्षा कारणास्तव जाहीर केले आहे की, लाल किल्ला मेट्रो स्टेशन 12 नोव्हेंबर रोजी बंद राहील, तर इतर सर्व मेट्रो स्थानके पूर्ववत सुरू राहतील. तथापी, घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीमने जिवंत काडतुसे आणि स्फोटक पदार्थांचे नमुने जप्त केले आहेत. एफएसएल टीमने स्फोटस्थळाची तपासणी करताना दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याव्यतिरिक्त, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या स्फोटकांचे नमुने देखील गोळा करण्यात आले आहेत. पहिला नमुना अमोनियम नायट्रेटसारखाच असल्याचे दिसून आले. तथापि, दुसरा स्फोटक अमोनियम नायट्रेटपेक्षा अधिक शक्तिशाली आणि धोकादायक असल्याचे मानले जात आहे. प्रयोगशाळेतील तपासणी पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या स्फोटकाचे नेमके स्वरूप निश्चित केले जाईल.