Tata Consumer Products Price Hike: सर्वसामान्यांच्या दैनंदिन बजेटवर लवकरच अतिरिक्त ताण येण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रसिद्ध एफएमसीजी कंपनी 'टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स'ने (Tata Consumer Products) आपल्या खाद्यपदार्थांचे भाव वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सातत्याने वाढणारा उत्पादन खर्च आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता यामुळे नफा सांभाळण्यासाठी कंपनीला हा निर्णय घ्यावा लागत आहे. याचा थेट परिणाम भारतीय कुटुंबांच्या रोजच्या स्वयंपाकघरावर होणार असून चहा, मीठ आणि पॅकबंद डाळींसारख्या मूलभूत वस्तू महाग होण्याची दाट शक्यता आहे.
का वाढणार दैनंदिन वस्तूंचे भाव?
जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, कच्च्या मालाच्या वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. तसेच, निसर्गाच्या लहरीपणामुळे व मान्सूनच्या विलंबाने चहाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे चहाच्या पानांचे दर बाजारात तब्बल 7 ते 10 टक्क्यांनी वधारले आहेत. या सर्व कारणांमुळे कंपनीचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला असून, त्याचा भार आता ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.
'या' वस्तूंच्या किमतींमध्ये होणार वाढ:
टाटा टी (चहाचे विविध ब्रँड्स)
टाटा सॉल्ट (मीठ)
टाटा संपन्ना (ब्रँडेड डाळी आणि मसाले)
इतर पॅकेज्ड खाद्यपदार्थ
नफ्यात वाढ तरीही भाववाढीची तयारी
विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या तिमाहीत कंपनीने तब्बल 5348.88 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून त्यांच्या महसुलात 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच निव्वळ नफ्यात 28 टक्क्यांची भर पडून तो 444.86 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. असे असले तरी, भविष्यातील तोटा टाळण्यासाठी कंपनीने चहाच्या दरात आधीच किरकोळ वाढ केली आहे. येत्या 15 ते 30 दिवसांत बाजारातील परिस्थितीचा आढावा घेऊन, खर्च नियंत्रणात न आल्यास इतर सर्वच उत्पादनांचे दर वाढवण्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे कंपनी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.