Junior Artist Heart Attack: मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी वृत्त समोर आले आहे. 'आरंभी' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत महत्त्वाचे काम करणारे जुनियर आर्टिस्ट संजीब सिंह यांचे वयाच्या 51 व्या वर्षी अचानक निधन झाले. रविवारी रात्री मालिकेचे चित्रीकरण आटोपून दुचाकीने घरी परतत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. वाटेत दुचाकीमध्ये इंधन भरण्यासाठी ते एका पेट्रोल पंपावर थांबले असता, त्यांना तीव्र चक्कर आली आणि ते जागीच कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चित्रीकरणादरम्यान बिघडली होती प्रकृती
फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) सरचिटणीस अशोक दुबे यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. संजीब सिंह हे साकीनाका येथील एसजे स्टुडिओमध्ये शूट करत होते. त्यांचे काम दुपारी 2:00 वाजता सुरू झाले होते आणि ते रात्री 3:00 वाजेपर्यंत चालणार होते. कामादरम्यान त्यांनी काही वेळा प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याचे सहकाऱ्यांना सांगितले होते आणि थोडा विश्रांतीचा वेळही घेतला होता. मात्र, पॅकअपनंतर घरी निघाल्यावर ही काळाची झेप आली. संजीब सिंह हे गेली 30 वर्षे या चित्रपट आणि टीव्ही उद्योगात कार्यरत होते.
कूपर रुग्णालयात शवविच्छेदन
मूळचे कोलकाता येथील रहिवासी असलेले संजीब सिंह हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात एक घटस्फोटित बहीण आणि सतत आजारी असणारा भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी संजीब यांच्यावरच होती, त्यामुळे त्यांच्या जाण्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा पार्थिव देह अंतिम संस्कारासाठी विमानाने कोलकाता येथे पाठवण्यात आला आहे. या कठीण प्रसंगात FWICE संघटनेने त्यांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.