Cockroach Awami Party: भारतामध्ये सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चा प्रभाव आता पाकिस्तानातही दिसू लागला आहे. उपहासात्मक आणि व्यंगात्मक राजकीय चळवळ म्हणून सुरू झालेल्या या ‘झुरळ आंदोलनाने’ सीमापारही तरुणांना आकर्षित केले असून, पाकिस्तानात ‘कॉकरोच अवामी पार्टी’ (CAP) आणि ‘कॉकरोच अवामी लीग’ (CAL) यांसारख्या नव्या ऑनलाइन गटांचा उदय झाला आहे. बेरोजगारी, राजकीय व्यवस्थेवरील नाराजी आणि तरुणांच्या असंतोषाला व्यंगात्मक शैलीत व्यक्त करण्यासाठी या पक्षांकडून ‘झुरळ’ हे प्रतीक वापरले जात आहे. भारतामध्ये या चळवळीची सुरुवात मे महिन्याच्या मध्यात झाली. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या बेरोजगार तरुणांची तुलना कथितरित्या “झुरळे” आणि “परजीवी” यांच्याशी केल्याच्या आरोपानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. जरी सरन्यायाधीशांनी नंतर स्पष्टीकरण दिले, तरी तोपर्यंत या वक्तव्याविरोधात उपहासात्मक आंदोलन आकार घेऊ लागले होते.
अमेरिकेत जनसंपर्क विषयाचे शिक्षण घेतलेले आणि आम आदमी पार्टीचे माजी सहकारी अभिजीत दिपके यांनी 16 मे रोजी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (CJP) सोशल मीडियावर घोषणा केली. त्यांनी सदस्य नोंदणीसाठी गुगल फॉर्मही सुरू केला. “होय, ते झुरळ मीच आहे,” असे म्हणत दिपके यांनी या आंदोलनाला बेरोजगार आणि दुर्लक्षित तरुणांचा आवाज असल्याचे सांगितले. काही दिवसांतच या पक्षाच्या इन्स्टाग्राम खात्याने 15 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स मिळवत भाजप आणि काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांनाही मागे टाकले. भारतातील ही कॉकरोच पार्टी उपहास, मीम्स आणि सोशल मीडिया मोहिमांच्या माध्यमातून ते शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगार, परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि अधिक जबाबदार प्रशासन यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष वेधत आहेत. गुरुवारी या पक्षाचे X वरील खाते भारतात रोखण्यात आले होते, मात्र काही तासांतच नव्या खात्यासह त्यांनी पुनरागमन करत “तुम्हाला वाटले आम्हाला संपवू शकाल?” अशी टोलेबाजी केली.
भारतातील या ‘झुरळ पार्टी’ची लोकप्रियता वाढताच त्याची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली आणि त्यानंतर पाकिस्तानातही अशाच स्वरूपाच्या पेजेस आणि गटांची निर्मिती सुरू झाली. ‘कॉकरोच अवामी पार्टी’ नावाच्या एका पाकिस्तानी इंस्टाग्राम पेजने तर आपल्या बायोमध्ये “हो, कॉपी केली आहे, पण कोणाला पर्वा आहे” असे लिहून भारतीय चळवळीपासून प्रेरणा घेतल्याची कबुली दिली आहे. हे पेज पाकिस्तानातील जनरेशन Z पिढीचा खरा आवाज बनण्याचा दावा करते. पाकिस्तानी आवृत्त्यांमध्ये हिरवा-पांढरा रंगसंगतीचा वापर करण्यात आला असून, त्या स्वतःला पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI), पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यांसारख्या पारंपरिक पक्षांना पर्याय म्हणून सादर करत आहेत. या अकाऊंट्सवर मीम्स, रील्स आणि व्यंगात्मक पोस्ट्सच्या माध्यमातून बेरोजगारी, शासनव्यवस्था आणि राजकीय असंतोषावर भाष्य केले जात आहे.
‘कॉकरोच अवामी लीग पाकिस्तान’ नावाच्या आणखी एका पेजने “हर हालात में जिंदा हैं” ही घोषणा स्वीकारली आहे, तर @CockroachAP नावाचे X अकाऊंट “जिन्हें सिस्टम ने कॉकरोच समझा, हम उन्ही आवाम की आवाज़ हैं” असा संदेश देत आहे. भारतातील ‘कॉकरोच जनता पार्टी’कडे स्पष्ट संस्थापक, वेबसाइट आणि संघटनात्मक रचना असली, तरी पाकिस्तानातील या शाखा सध्या विखुरलेल्या आणि स्वतंत्र स्वरूपात कार्यरत आहेत. सोशल मीडियावर सुरू झालेल्या या ‘झुरळ चळवळी’ने भारत आणि पाकिस्तानातील तरुणांच्या नाराजीला वेगळ्या शैलीत अभिव्यक्ती दिली आहे. व्यंग आणि विनोदाच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारणारी ही नवी डिजिटल चळवळ आता दोन्ही देशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.