OTT App Ban: अश्लील आणि समाजघातक मजकूर प्रसारित करणाऱ्या 50 ओटीटी (OTT) ॲप्सवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करत बंदी घातली आहे. यापूर्वीही केंद्राने अशाच प्रकारच्या सामग्रीवर कारवाई करत 'ALT', 'Ullu' आणि 'Desiflix' यांसह 25 ॲप्सवर बंदी घातली होती. तसेच, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आणखी 5 ॲप्सवर अशाच कारणांमुळे कारवाई करण्यात आली होती. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात या कारवाईची अधिकृत माहिती दिली.
आयटी नियम आणि कायद्यांचे उल्लंघन आढळल्याने कारवाई
केंद्र सरकारने IT (Digital Media Ethics Code) Rules, 2021 अंतर्गत ही कारवाई केली आहे. तपासात या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सामग्रीने भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 294 तसेच महिलांच्या अश्लील सादरीकरणास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याच्या (Indecent Representation of Women (Prohibition) Act) कलम 4 चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर कायदेशीर उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित ॲप्सचा प्रवेश तातडीने बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
3 तासांत बेकायदेशीर मजकूर हटवणे बंधनकारक
सरकारने बंदी घातलेल्या 50 ॲप्सची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. मात्र, आयटी नियमांमध्ये करण्यात आलेल्या नव्या सुधारणांनुसार न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी निर्देश मिळाल्यानंतर 3 तासांच्या आत बेकायदेशीर मजकूर हटवणे सोशल मीडिया आणि इतर मध्यस्थ प्लॅटफॉर्मसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट आणि वेब शोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सदस्यसंख्या आणि महसूल मिळवला जात असल्याचेही सरकारच्या निदर्शनास आले आहे.
ISPs आणि ॲप स्टोअर्सनाही स्पष्ट निर्देश
या कारवाईअंतर्गत इंटरनेट सेवा पुरवठादारांना (ISPs) संबंधित ॲप्सचा प्रवेश पूर्णपणे ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, Google Play Store आणि Apple App Store वरूनही ही ॲप्स हटवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील अश्लील आणि बेकायदेशीर सामग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केल्याचे सांगितले आहे.