Cyber Attack On CBSE Revaluation Portal: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता 12 वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलला (Revaluation Portal) सुरुवातीपासूनच मोठ्या तांत्रिक अडचणी आणि सायबर हल्ल्यांचा सामना करावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतः CBSE ने या गंभीर प्रकाराला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. असे असूनही, आज दुपारी 3 वाजेपर्यंत 16,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांचे पुनर्मूल्यांकनाचे अर्ज यशस्वीरित्या सादर केले आहेत, असे मंडळाने 'X' (पूर्वीचे Twitter) वरील एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
अवघ्या 2 मिनिटांत 15 लाख 'हिट्स'; सेवा विस्कळीत करण्याचा कट
CBSE ने दिलेल्या माहितीनुसार, आज हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांनी निकालाच्या पडताळणीसाठी पोर्टलला भेट दिली. मात्र, याच वेळी काही उपद्रवी घटकांनी (Malicious Actors) जाणीवपूर्वक सायबर हल्ल्यांचा भडिमार करून ऑनलाइन सेवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. यातील सर्वात मोठी घटना म्हणजे 'Denial of Service' (DoS) प्रकारचा सायबर हल्ला होय. या हल्ल्यामुळे अवघ्या 2 मिनिटांत पोर्टलवर तब्बल 15 लाख 'हिट्स' आल्या आणि 1 लाखांहून अधिक वेळा अनधिकृतपणे फाईल्स ॲक्सेस करण्याचे प्रयत्न झाले. या संकटानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय लक्षात घेऊन मंडळाने तातडीने सुधारणा केल्या असून, प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी 'सेशन टाइम लिमिट' वाढवली आहे.
CBSE 12 वीच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी पात्रतेचे कडक नियम
या पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणी प्रक्रियेसाठी मंडळाने काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार, केवळ तेच उमेदवार पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यास पात्र असतील, ज्यांनी आधी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी (Photocopy) अर्ज केला होता. अर्जदाराला संबंधित विषयाच्या 'गुणदान पद्धतीचा' (Marking Scheme) संदर्भ घ्यावा लागेल, जी प्रश्नपत्रिकेसह मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विनंत्यांची स्थिती त्यांच्या लॉगिन खात्यावर पाहिली जाऊ शकते. विशेष नोंद म्हणजे, पुनर्मूल्यांकनानंतर गुणांमध्ये अगदी 1 गुणाची घट झाली, तरी ती प्रणालीत अंमलात आणली जाईल. तसेच, या प्रक्रियेचा निकाल अंतिम असेल आणि याविरुद्ध कोणतेही अपील किंवा फेरविचार स्वीकारले जाणार नाही.
'COEMPT' कंपनीचे कंत्राट रडारवर
दुसरीकडे, CBSE च्या 'ऑन-स्क्रीन मार्किंग' (OSM) प्रणालीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रणालीशी संबंधित सेवा पुरवठादार असलेल्या 'COEMPT' कंपनीला कंत्राट देण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने CBSE कडून सविस्तर अहवाल मागवला आहे. मंत्रालयाने या निविदा प्रक्रियेचा (Tender Process) संपूर्ण तपशील, कंत्राट देताना अवलंबलेली कार्यपद्धती आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सेवा पुरवठादाराच्या निवडीदरम्यान सर्व विहित निकष आणि सरकारी नियमांचे अचूक पालन झाले होते की नाही, हे तपासणे हा या आढाव्याचा मुख्य उद्देश आहे.
OSM प्रणाली संशयाच्या भोऱ्यात
पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान अपलोड केलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी गंभीर त्रुटी आणि चुका निदर्शनास आणून दिल्यानंतर हा संपूर्ण वाद पेटला आहे. यामुळे सध्याच्या OSM (On-Screen Marking) प्रणालीवर संशयाची सुई निर्माण झाली असून त्याची कसून छाननी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रालयाने निविदा प्रक्रियेशी संबंधित प्राथमिक माहिती आधीच संकलित केली असून, सदर कंत्राट कशा प्रकारे आणि कोणत्या निकषांवर प्रदान करण्यात आले, याच्या विविध कायदेशीर पैलूंची आता वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे.