Watermelon Poisoning Case: मुंबईत घडलेली कलिंगड दुर्घटना ताजी असतानाचं आता छत्तीसगडमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बऱ्याच वेळापूर्वी कापून ठेवलेले कलिंगड खाल्ल्याने एका 15 वर्षांच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागला आहे, तर त्याच्यासोबतची इतर तीन मुले गंभीर आजारी पडली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मामाच्या गावी ओढवला काळ
प्राप्त माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना घुरकोट गावात घडली. मूळचा पोडी दल्हा गावचा असलेला अखिलेश धिवर (15) हा मुलगा आपल्या मामाच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आला होता. सोमवारी सकाळी कापून ठेवलेले कलिंगड अखिलेश आणि त्याच्यासोबतच्या तीन मुलांनी (वय 4, 12 आणि 13 वर्षे) संध्याकाळी खाल्ले. फळ खाल्ल्यानंतर काही वेळातच या सर्वांना उलट्या, जुलाब आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दुर्दैवाने, अखिलेशला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
चिकन आणि कलिंगडाचे 'डेन्जर' कॉम्बिनेशन?
प्राथमिक तपासानुसार, कलिंगड कापून बराच वेळ उघड्यावर ठेवल्याने त्यात घातक जीवाणू (बॅक्टेरिया) तयार झाले असावेत, ज्यामुळे तीव्र 'फूड पॉयझनिंग' झाले असावे असा डॉक्टरांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, मुलांनी कलिंगडासोबत चिकनचेही सेवन केले होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून जिल्हाधिकाऱ्यांनीही तपासणीचे आदेश दिले आहेत.
आरोग्य तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
उन्हाळ्याच्या दिवसात फळांचे सेवन करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे:
उघड्यावरील फळे टाळा: कापलेली आणि बराच वेळ उघड्यावर ठेवलेली फळे विषासारखी काम करू शकतात.
ताजेपणाला महत्त्व: फळे कापल्यानंतर ती शक्य तितक्या लवकर खावीत.
स्वच्छता: फळे कापण्यापूर्वी ती नीट धुवून घ्यावीत आणि दीर्घकाळ उघड्यावर ठेवू नयेत.
हेही वाचा – Kalyan Crime : आई घरात नसताना भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, "घरात दोष असल्याचे सांगून…"
दरम्यान, उर्वरित तीन मुलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, या घटनेमुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.