Warehouse Collapse: पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आज, बुधवारी एका निर्माणाधीन गोदामाचा स्लॅब कोसळल्याने भीषण अपघात झाला. पहिल्या मजल्याचे काम सुरू असताना अचानक लोखंडी सांगाडा कोसळल्याने हा अपघात घडल्याचे समजते. या दुर्घटनेत सुमारे 40 हून अधिक कामगार मातीच्या आणि सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती वर्तवली जात आहे. सध्या युद्धपातळीवर मदतकार्य राबवले जात असून, आतापर्यंत 13 मजुरांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
लोखंडी बीम आणि काँक्रीट कापून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
इमारत कोसळली तेव्हा आत नेमके किती लोक काम करत होते, याचा अचूक आकडा अद्याप समोर आलेला नाही; मात्र हा आकडा 40 च्या पार असण्याची शक्यता आहे. लष्कराचे जवान, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून गॅस कटरच्या मदतीने लोखंडी खांब कापून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
छताचे काम सुरू असतानाच मजुरांवर कोसळला काळ
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोदामाच्या छताचे बांधकाम वेगात सुरू असतानाच हा मोठा बिघाड झाला. वरून प्रचंड वजनाचे लोखंडी बीम आणि सिमेंटचे काँक्रीट थेट खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडले. यामुळे अनेक कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि ते आतच अडकून पडले.
अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
या दुर्घटनेनंतरचा एक थरारक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चहूबाजूला लोखंडी खांब आणि काँक्रीटचे ढिगारे विखुरलेले दिसत आहेत.
#WATCH | Taratala | West Bengal Minister Dr. Indranil Khan says, "Our priority is to rescue the people trapped inside…All the rescue teams are present at the spot…This is all illegal which was constructed when the TMC was in power…" https://t.co/O68iBSS8Lb pic.twitter.com/nRD4U5oEo8 — ANI (@ANI) June 24, 2026
बचावकार्याला प्राधान्य, बेकायदेशीर बांधकामावरून राजकारण तापले
अपघाताची माहिती मिळताच मंत्री डॉ. इंद्रनील खान यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवणे हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, टीएमसी (TMC) सरकारच्या कार्यकाळात या भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.