Strait of Hormuz Closure: पर्शियन आखातातील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराणने शुक्रवारी हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा एकदा बंद करण्याची मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने इराणवर लादलेली सागरी नाकेबंदी आणि इराणच्या प्रमुख बंदरांना अमेरिकन नौदलाने घातलेला वेढा, याला प्रत्युत्तर म्हणून ही कठोर पाऊले उचलल्याचा दावा तेहरानने केला आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर अवघ्या २४ तासांच्या आत इराणने आपल्या निर्णयामध्ये 'यू-टर्न' घेतल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
तेलवाहू टँकर्सची वाहतूक ठप्प
इराणची अधिकृत वृत्तसंस्था 'फार्स न्यूज'ने (Fars News) दिलेल्या वृत्तानुसार, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी सर्व तेलवाहू टँकर्सची वाहतूक आता पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. ही सामुद्रधुनी आखाती प्रदेशातील तेल निर्यातीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग मानली जाते. इराणच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता निर्माण झाली असून, अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा – Russian Oil : भारताला दिलासा! अमेरिकेचा रशियन तेलाबाबत मोठा निर्णय, ट्रम्प प्रशासनाने 48 तासांत केलं घूमजाव
नौदलाचा घेराव आणि युद्धाचे ढग
इराणी अधिकाऱ्यांनी या कृतीचे समर्थन करताना सांगितले की, अमेरिकेने पर्शियन आखातात इराणच्या बंदरांभोवती जी नौदलाची नाकेबंदी केली आहे, त्याला दिलेले हे थेट चोख प्रत्युत्तर आहे. अमेरिकेच्या आक्रमक धोरणांमुळे इराणची कोंडी होत असून, स्वतःच्या संरक्षणासाठी हा मार्ग बंद करणे अनिवार्य असल्याचे तेहरानने स्पष्ट केले आहे. या घडामोडींमुळे आखाती प्रदेशात युद्धाचे ढग गडद झाले असून आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता वाढली आहे.