Skydivers Plane Crash: पूर्व फ्रान्समधून एका अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली आहे. नॅन्सी (Nancy) शहराजवळील टॉमब्लेन (Tomblaine) परिसरात आज रविवारी स्कायडायव्हर्सना घेऊन जाणाऱ्या एका विमानाला भीषण अपघात झाला. हे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानातून स्कायडायव्हिंगचा थरार अनुभवण्यासाठी निघालेल्या क्रीडाप्रेमींचा एक गट प्रवास करत होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे.
सुरक्षेसाठी संपूर्ण परिसर सील
स्थानिक फ्रेंच वृत्तवाहिनी France 3 Grand Est ने दिलेल्या माहितीनुसार, विमान जमिनीवर कोसळल्यानंतर त्यात मोठा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. संभाव्य धोका आणि सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने तत्परता दाखवत अपघातग्रस्त भागाची नाकेबंदी केली आहे. या विमानाने केवळ स्कायडायव्हिंगच्या उद्देशानेच धावपट्टीवरून उड्डाण केले होते, मात्र हवेत असतानाच हा घात झाला.
हेही वाचा – Social Media Ban: सोशल मीडिया कंपन्यांना मोठा झटका; सरकारने बंद केली YouTube आणि TikTok ची 47 लाख खाती
तपास यंत्रणांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; अपघाताचे कारण अस्पष्ट
बचावकार्यात आणि तपास प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून फ्रेंच पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना 'साल्वाडोर अलेंदे स्ट्रीट' (Salvador Allende Street) आणि त्याभोवतीच्या परिसरात गर्दी न करण्याचे तसेच घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, हे विमान नेमके कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा कारणामुळे कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून या हवाई अपघाताचा कसून तपास केला जात असून, लवकरच या घटनेचा सविस्तर अहवाल जाहीर करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.