Chabahar Port Attack: पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, इराणच्या दक्षिण-पूर्वेकडील चाबहार मुक्त व्यापार क्षेत्रावर अमेरिकेने भीषण हवाई हल्ला केला आहे. अमेरिकन वृत्तसंस्था 'व्हॉइस ऑफ अमेरिका'ने दिलेल्या माहितीनुसार, चाबहार बंदराजवळील डोंगराळ भागात असलेल्या लष्करी तळांना अमेरिकन फायटर जेट्सनी लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड स्फोट झाले असून, भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या व्यापारी मार्गावर युद्धाचे सावट पसरले आहे.
हल्ल्याचे नेमके कारण काय?
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा आज 17 वा दिवस आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांना आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' या सागरी मार्गाच्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही मोठी कारवाई केल्याचे मानले जात आहे. इराणला हिंद महासागरात थेट प्रवेश देणारे चाबहार हे एकमेव महत्त्वाचे बंदर असल्याने अमेरिकेने या धोरणात्मक ठिकाणावर हल्ला करून इराणची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारताची चिंता का वाढली?
चाबहार बंदर हे केवळ इराणचे व्यापारी केंद्र नसून भारतासाठी 'मध्य आशियाचे प्रवेशद्वार' आहे. भारताने या प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे. 2024 मध्ये भारताने इराणसोबत 10 वर्षांचा ऐतिहासिक करार केला आहे. भारताची सरकारी कंपनी IPGL या बंदराच्या विकासासाठी 370 दशलक्ष डॉलर्स खर्च करणार आहे. अफगाणिस्तान आणि युरोपपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला पाकिस्तानला वळसा घालून हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरतो. येथे भारताने ॲल्युमिनियम स्मेल्टर आणि युरिया प्रकल्पांसाठी अब्जावधी डॉलर्सची तरतूद केली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?
भारताने 2030 पर्यंत 10 ट्रिलियन डॉलर्स आणि 2034 पर्यंत 15 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी स्थिर व्यापार मार्ग आवश्यक आहेत. मात्र, चाबहार बंदर परिसरात युद्ध सुरू झाल्यामुळे भारताच्या या दीर्घकालीन योजनांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. व्यापारी भागीदारांना मिळणारी कर सवलत आणि सुरक्षित वाहतूक आता धोक्यात आली आहे.
चाबहार धोरणात्मकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे
1992 मध्ये स्थापन झालेले हे बंदर 'गल्फ ऑफ ओमान'च्या किनाऱ्यावर असून ते पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. भारतासाठी हे बंदर केवळ व्यापारी नाही, तर धोरणात्मकदृष्ट्याही अत्यंत मोलाचे आहे. या हल्ल्यामुळे आता भारताला आपल्या परराष्ट्र धोरणात आणि गुंतवणुकीच्या सुरक्षेबाबत नव्याने विचार करावा लागणार आहे.