Dhurandhar 2 Trailer: ‘धुरंधर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या ऐतिहासिक यशानंतर आता साऱ्या जगाचे लक्ष त्याच्या सिक्वेलकडे म्हणजेच ‘धुरंधर द रिव्हेंज’ कडे लागले आहे. पहिल्या भागाच्या प्रदर्शनावेळीच निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची घोषणा करून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरने या उत्साहात भर टाकली होती. या चित्रपटाचा ट्रेलर 6 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मात्यांनी आता प्रदर्शनाची तारीख बदलली असून अधिकृत अंतिम तारीख जाहीर केली आहे.
या दिवशी रिलीज होणार ट्रेलर
जिओ स्टुडिओजने सोशल मीडिया पोस्टद्वारे ट्रेलरची नवी तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. ‘धुरंधर द रिव्हेंज’चा अधिकृत ट्रेलर उद्या, 7 मार्च रोजी सकाळी 11:01 वाजता प्रदर्शित होणार आहे. या घोषणेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियेचा पाऊस पाडला आहे. “आता अधिक वाट पाहणे अशक्य आहे,” अशा भावना चाहते व्यक्त करत आहेत. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
आदित्य धर यांचा दिग्दर्शनातील ‘मास्टरक्लास’
डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली वेगळी छाप सोडली. दिग्दर्शक आदित्य धर यांनी हेरगिरी थ्रिलर आणि गँगस्टर ड्रामा यांचा असा काही मेळ घातला की प्रेक्षक भारावून गेले. कराचीतील लियारी परिसरातील गुंतागुंतीची कथा पडद्यावर मांडण्याचे कौशल्य धर यांनी दाखवले. शाश्वत सचदेव यांच्या दमदार पार्श्वसंगीताने यातील थरार अधिकच वाढवला असून, आता दुसऱ्या भागात हा सस्पेन्स कोणत्या पातळीवर जाणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
तगडी स्टारकास्ट आणि विक्रमी बॉक्स ऑफिस
या चित्रपटाच्या यशात कलाकारांच्या अभिनयाचा मोठा वाटा आहे. अक्षय खन्नाचा अप्रतिम अभिनय, संजय दत्तची कडक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आणि अर्जुन रामपालचा निर्दयी खलनायक प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला आहे. आर. माधवन आणि राकेश बेदी यांनीही आपल्या भूमिकांना न्याय दिला. मात्र, रणवीर सिंगसाठी हा चित्रपट कारकिर्दीतील सर्वात मोठे वळण ठरला. पहिल्या भागाने देशांतर्गत 838.5 कोटी आणि जागतिक स्तरावर 1305.35 कोटींपेक्षा जास्त कमाई करून इतिहास घडवला. पाकिस्तान आणि दुबईसारख्या देशात बंदी असूनही, या चित्रपटाची क्रेझ आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून आहे.