Infosys New CEO: देशातील दिग्गज आयटी कंपनी 'इन्फोसिस'ने आपल्या सर्वोच्च नेतृत्वात मोठ्या फेरबदलाची घोषणा केली आहे. कंपनीच्या 'नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी'ने केलेल्या शिफारशीनुसार, संचालक मंडळाने आशिष कुमार डॅश यांची नवीन CEO-Designate म्हणून निवड केली आहे. ते तात्काळ प्रभावाने ही नवी जबाबदारी स्वीकारतील. आवश्यक त्या सर्व कायदेशीर मंजुरींनंतर, 1 एप्रिल 2027 पासून ते अधिकृतपणे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून पदभार सांभाळतील.
'सीईओ-डिझिग्नेट' म्हणून कामकाज
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आशिष कुमार डॅश हे 31 मार्च 2027 पर्यंत 'सीईओ-डिझिग्नेट' म्हणून भूमिका पार पाडतील आणि त्यानंतर कंपनीची सूत्रे पूर्णपणे त्यांच्या हाती येतील. सेबी (SEBI) किंवा अन्य कोणत्याही नियामक प्राधिकरणाकडून त्यांना संचालकपद भूषवण्यास कोणताही अटकाव नाही, असेही इन्फोसिसने स्पष्ट केले आहे.
कोण आहेत आशिष कुमार डॅश?
आशिष कुमार डॅश सध्या इन्फोसिसमध्ये 'Executive Vice President' या पदावर कार्यरत आहेत. ते सर्व्हिसेस, युटिलिटीज, रिसोर्सेस, एनर्जी आणि एंटरप्राइझ सस्टेनेबिलिटी या महत्त्वाच्या व्यावसायिक विभागांचे नेतृत्व करतात. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रात त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी World Economic Forum, संयुक्त राष्ट्रांची Global Investors for Sustainable Development Alliance तसेच B20 Summit 2023 यांसारख्या जागतिक मंचांवर इन्फोसिसचे प्रतिनिधित्व केले आहे.
हेही वाचा – ITR E-Verification: ITR भरलाय? 30 दिवसांची मुदत संपण्याआधी पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा विवरणपत्र ठरेल रद्द
शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कर्मचाऱ्यांसाठी RSUs ची घोषणा
आशिष कुमार डॅश यांनी IIT Kharagpur मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून 'ग्लोबल लीडरशिप प्रोग्राम' पूर्ण केला आहे. सध्या ते अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथून कंपनीच्या जागतिक कामकाजाची धुरा सांभाळतात. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिस जागतिक स्तरावर कोणती नवी वाटचाल करते, याकडे उद्योगजगताचे लक्ष लागले आहे.