Indian Railway Refund Rules: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना सहसा असे वाटते की, एकदा का रेल्वेचा प्रवास पूर्ण झाला की तिकीटाचे पैसे कोणत्याही परिस्थितीत परत मिळत नाहीत. परंतु, रेल्वेच्या नियमावलीत एक असा नियम आहे जो प्रवाशांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून देऊ शकतो. ठराविक अटी आणि रेल्वेच्या नियमांचे पालन केल्यास, प्रवास संपल्यानंतरही तिकीटाची रक्कम किंवा भाड्यातील फरक परत मिळवता येतो. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या या नियमाची माहिती अत्यंत कमी लोकांना असल्याने अनेकदा प्रवाशांचे आर्थिक नुकसान होते.
एसी तिकीट असूनही जनरल किंवा स्लीपरने प्रवास करावा लागला? असा मिळवा भाड्यातील फरक
अनेकदा तांत्रिक बिघाड किंवा रेल्वेच्या नियोजनातील त्रुटींमुळे प्रवाशांकडे एसी (AC) किंवा उच्च श्रेणीचे आरक्षित तिकीट असूनही त्यांना खालच्या श्रेणीच्या (Lower Class) डब्यातून प्रवास करावा लागतो. अशा वेळी प्रवाशांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळू शकतात. यासाठी प्रवासादरम्यानच ट्रेनमधील टीटीई (TTE) कडून 'लोअर क्लास सर्टिफिकेट' (LCC) म्हणजेच निम्न श्रेणीत प्रवास केल्याचे प्रमाणपत्र लिहून घेणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र सोबत जोडल्यास उच्च श्रेणी आणि ज्या श्रेणीत प्रवास केला, त्या दोन्ही भाड्यातील फरकाची रक्कम रेल्वेकडून प्रवाशाला परत केली जाते.
'या' 3 मुख्य परिस्थितींमध्ये प्रवाशांना मिळू शकतो पूर्ण परतावा
रेल्वेच्या नियमांनुसार भाड्यातील फरक किंवा पूर्ण तिकीटाचे पैसे परत मिळण्यासाठी खालील परिस्थिती आणि अटी लागू होतात:
ट्रेन पूर्णपणे रद्द झाल्यास: रेल्वे प्रशासनाने गाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद किंवा रद्द केली, तर प्रवाशांना तिकीटाचे पूर्ण पैसे परत मिळतात. यासाठी प्रवाशांना कोणताही टीडीआर (TDR – Ticket Deposit Receipt) दाखल करावा लागत नाही, रेल्वे थेट खात्यात पैसे जमा करते.
मार्ग बदलल्यास किंवा अंशतः रद्द झाल्यास: ट्रेनचा नियोजित मार्ग बदलला किंवा ट्रेनचा काही भाग रद्द झाला आणि प्रवाशाने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला, तर टीडीआर (TDR) दाखल करून रिफंड मिळवता येतो.
ट्रेन 3 तास किंवा त्याहून अधिक उशीर असल्यास: तुमची ट्रेन नियोजित वेळेपेक्षा 3 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ उशिराने धावत असेल आणि यामुळे तुम्ही प्रवास न करण्याचे ठरवले, तर पूर्ण भाडे परत मिळते. मात्र, यासाठी वेळेत टीडीआर दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा – Auto Industry Layoffs: मोठी बातमी! गाड्या बनवणारी 'ही' प्रसिद्ध कंपनी करणार 1 लाख कर्माचाऱ्यांची हकालपट्टी
रेल्वे प्रवासादरम्यान असा कोणताही प्रसंग उद्भवल्यास प्रवाशांनी जागरूक राहून टीटीईकडून आवश्यक ती कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे गोळा करावीत आणि वेळेच्या मर्यादेत ऑनलाइन टीडीआर (TDR) फाईल करावा, जेणेकरून तुमचे पैसे रेल्वेकडून सुरक्षितपणे परत मिळतील.