Cyber Attack Safety: इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI च्या काळामध्ये सायबर हल्ले ओळखणे आणि ते रोखणे अधिक कठीण झाले आहे. दररोज हजारो लोकांचा डेटा आणि कष्टाचे पैसे हॅकर्सकडून चोरले जात आहेत. अशा परिस्थितीत जर तुमची सिस्टम, सोशल मीडिया खाते किंवा स्मार्टफोन हॅक झाला असेल, तर घाबरून न जाता तातडीने काही पावले उचलणे आवश्यक आहे. उशीर केल्यास तुमचे आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकते.
1. इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटी त्वरित बंद करा
जर तुम्हाला तुमचे डिव्हाइस हॅक झाल्याचा संशय आला, तर सर्वात आधी इंटरनेट डिस्कनेक्ट करा. जोपर्यंत तुमचे डिव्हाइस इंटरनेटशी जोडलेले असते, तोपर्यंत हॅकर तुमच्या सिस्टिममधून डेटा चोरू शकतो. तुमचा फोन 'विमान मोड'वर (Airplane Mode) टाका आणि वाय-फाय, ब्लूटूथसह सर्व कनेक्टिव्हिटी पर्याय बंद करा, ज्यामुळे हॅकरचा तुमच्या डिव्हाइसवरील ताबा तुटेल.
2. बँक खाती आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक करा
तुमच्या बँक खात्यात किंवा क्रेडिट कार्डद्वारे कोणतेही संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळल्यास, वेळ न घालवता कार्ड ब्लॉक करा. तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला किंवा अधिकृत ॲपद्वारे याची माहिती द्या. बेकायदेशीर व्यवहारांची तक्रार संबंधित सुरक्षा एजन्सींकडे नोंदवणे भविष्यातील कायदेशीर प्रक्रियेसाठी महत्त्वाचे ठरते.
3. सर्व खात्यांचे पासवर्ड बदला
हॅकरने तुमचा डेटा मिळवला असेल, तर तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचे (उदा. ईमेल, बँकिंग, सोशल मीडिया) पासवर्ड बदला. मात्र, हे करताना एक महत्त्वाची काळजी घ्या: हॅक झालेल्या डिव्हाइसवरून पासवर्ड बदलू नका. यासाठी दुसरा सुरक्षित संगणक किंवा स्मार्टफोन वापरा. नवीन पासवर्ड तयार करताना जुन्या पासवर्डशी साधर्म्य नसलेले आणि कठीण 'स्पेशल कॅरेक्टर्स' वापरा.
4. अँटीव्हायरसने डिव्हाइस स्कॅन करा
एकदा खाती सुरक्षित केल्यानंतर, तुमच्या डिव्हाइसमधील मालवेअर किंवा व्हायरस शोधण्यासाठी संपूर्ण सिस्टम स्कॅन करा. यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट डिफेंडर किंवा इतर नामांकित अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची मदत घेऊ शकता. हे टूल्स लपलेले व्हायरस शोधून ते नष्ट करण्यास मदत करतात.
हेही वाचा – YouTube व्हिडिओजमधून होणाऱ्या कमाईचे गणित समजून घ्या; किती व्ह्यूज मिळाल्यानंतर किती पैसे मिळतात?
5. शेवटचा पर्याय: फॅक्टरी रीसेट करा
अनेकदा अँटीव्हायरस स्कॅन केल्यानंतरही काही मालवेअर सिस्टिममध्ये राहू शकतात. जर तुम्हाला अजूनही संशयास्पद हालचाली किंवा अनोळखी ॲप्स दिसत असतील, तर तुमचे डिव्हाइस 'फॅक्टरी रीसेट' (Factory Reset) करणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. यामुळे तुमच्या सिस्टिममधील सर्व डेटा पुसला जाईल आणि फोन किंवा संगणक पुन्हा पहिल्यासारखा सुरक्षित होईल.