Credit Card Rewards Taxation in India : बँका आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्डच्या वापरासाठी कॅशबॅक, एअर माइल्स किंवा लॉयल्टी पॉइंट्सच्या स्वरूपात अनेक रिवॉर्ड्स देत असतात. जे लोक क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर करतात, त्यांना याचा मोठा फायदा होतो. मात्र, 'Income Tax Act, 2025' लागू झाल्यानंतर, या रिवॉर्ड्सवर टॅक्स लागतो का, असा प्रश्न अनेक कार्डधारकांच्या मनात निर्माण झाला आहे. कर तज्ज्ञांच्या मते, बहुतेक क्रेडिट कार्ड बेनेफिट्स हे थेट खर्चाशी संबंधित असल्याने ते करपात्र उत्पन्नाच्या कक्षेत येत नाहीत. तेव्हा, जरी सामान्य रिवॉर्ड्सवर टॅक्स लागत नसला, तरी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये प्राप्तिकर विभाग त्याची छाननी करू शकतो. तसेच, खालील बाबी असल्यास रिवॉर्ड्सवर टॅक्स लागू होण्याची शक्यता असते. जाणून घेऊ, याविषयी सविस्तर माहिती..
कधी लागू होऊ शकतो टॅक्स?
रोख रूपांतरण: जर रिवॉर्ड पॉइंट्सचे रूपांतर थेट कॅश (Cash) किंवा त्याच्या समकक्ष मूल्यात केले जात असेल.
खर्चाशी संबंध नसणे: जर रिवॉर्ड हे प्रत्यक्ष खर्चाशी संबंधित नसून स्वतंत्रपणे मिळाले असेल.
व्यावसायिक वापर: जर हे रिवॉर्ड्स व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित व्यवहारांतून (Business Expenses) मिळाले असतील.
अशा वेळी या फायद्यांना 'उत्पन्न' मानले जाऊ शकते आणि त्यावर कर आकारला जाऊ शकतो.
50,000 रुपयांची मर्यादा आणि नियम
टॅक्स एक्सपर्टसकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर कायद्यात रिवॉर्ड्ससाठी कोणतीही ठराविक मर्यादा ठरवलेली नाही. मात्र, जर हे रिवॉर्ड्स 'गिफ्ट' (Gift) श्रेणीत येत असतील आणि त्यांची वार्षिक किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर 'Income from Other Sources' अंतर्गत टॅक्स भरावा लागू शकतो. रूटीन कॅशबॅक किंवा पॉइंट्स हे 'डिस्काउंट' किंवा 'रिबेट' मानले जातात, त्यामुळे ते उत्पन्नाच्या व्याख्येत येत नाहीत.
हेही वाचा – Paytm वर निर्बंध, वापरकर्त्यांमध्ये संभ्रम! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? जाणून घ्या
आयटीआर (ITR) मध्ये माहिती देणे गरजेचे आहे का?
बहुतेक तज्ज्ञांचे असे मत आहे की, छोट्या कॅशबॅक किंवा पॉइंट्सची माहिती Income Tax Return मध्ये देणे अनिवार्य नाही. मात्र, जर रिवॉर्ड्सचे मूल्य खूप जास्त असेल किंवा ते व्यवसायासाठी वापरलेल्या कार्डवरून मिळाले असतील, तर त्याची माहिती देणे सुरक्षित ठरते. यामुळे भविष्यात कर विभागाकडून होणारी संभाव्य चौकशी किंवा छाननी टाळता येते. करदात्यांनी आपल्या मोठ्या रिवॉर्ड्सचे स्वरूप ओळखून योग्य तो निर्णय घेणे हिताचे आहे.
थोडक्यात सांगायचे तर, तुमच्या वैयक्तिक खर्चावर मिळणारे नियमित क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स टॅक्स फ्री आहेत. मात्र, जेव्हा या रिवॉर्ड्सचा वापर उत्पन्नासारखा होऊ लागतो किंवा त्याची रक्कम मर्यादेपेक्षा जास्त होते, तेव्हा प्राप्तिकर विभागाचे लक्ष त्यावर जाऊ शकते. त्यामुळे मोठ्या रक्कमेचे रिवॉर्ड पॉइंट्स वापरताना कर नियमांची खात्री करून घेणे आवश्यक आहे.