Arabian Sea Tension amid Pakistan Missile Test Plans : अरब समुद्रात भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या एक मोठी सामरिक वर्चस्वाची लढाई पाहायला मिळत आहे. पाकिस्तान एका संशयास्पद क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत असतानाच, भारतीय नौदलाने आपले सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग युद्धनौका 'आयएनएस ध्रुव' (INS Dhruv) तैनात करून पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. या हालचालीमुळे पाकिस्तानला रणनीतिकदृष्ट्या बॅकफूटवर जावे लागले असून अरबी समुद्रातील तणाव कमालीचा वाढला आहे. शत्रूच्या क्षेपणास्त्रांवर अचूक नजर ठेवण्यासाठी नेहमीच सज्ज असलेल्या या युद्धनौकेच्या उपस्थितीने पाकिस्तानचे मनसुबे उधळले गेले आहेत.
पाकिस्तानची 'नोटाम' घोषणा आणि भारताचा सडेतोड प्रत्युत्तर
पाकिस्तानने 14-15 एप्रिल रोजी चाचणीसाठी अरब समुद्रात 'नोटाम' (NOTAM) आणि सागरी इशारा जारी केला होता. कराची, ओरमारा आणि ग्वादर जवळील साधारण 415 ते 450 किलोमीटरचा परिसर 'धोकादायक क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानची ही चाचणी सुरू होण्याच्या 24 तास आधीच, म्हणजेच 13 एप्रिल रोजी भारताने आपले 'आयएनएस ध्रुव' अरबी समुद्रात उतरवले. भारताच्या या तत्परतेमुळे पाकिस्तानची गुप्त माहिती मिळवण्याची योजना पूर्णपणे विसकळीत झाली आहे.
नेमकी कशाची चाचणी घेणार होता पाकिस्तान?
पाकिस्तानी लष्कराने अधिकृतपणे आपली योजना उघड केली नसली तरी, संरक्षण तज्ज्ञांचे दोन मुख्य अंदाज आहेत. पाकिस्तान त्यांच्या एखाद्या 'सर्फेस-टू-सर्फेस' मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची किंवा समुद्रातून डागल्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रणालीची चाचणी घेण्याच्या तयारीत आहे. याशिवाय, पाकिस्तान आपल्या नौदलाच्या नव्या तांत्रिक प्लॅटफॉर्मची क्षमता तपासत असल्याचीही शक्यता आहे. मात्र, आयएनएस ध्रुवच्या रडारपासून वाचणे आता पाकिस्तानसाठी अशक्य झाले आहे.
'आयएनएस ध्रुव': समुद्रातील भारताचे डोळे आणि कान
'आयएनएस ध्रुव' हे केवळ युद्धनौका नसून ती समुद्रातील भारताची एक फिरती गुप्तचर संस्था आहे. ही युद्धनौका शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा मार्ग ट्रॅक करण्यासाठी आणि त्यांची तांत्रिक माहिती गोळा करण्यासाठी खास डिझाइन केलेली आहे. शत्रूच्या रडारचे सिग्नल आणि इलेक्ट्रॉनिक उत्सर्जन पकडण्यात हे जहाज अत्यंत कार्यक्षम आहे. जर पाकिस्तानने कोणतेही नवीन क्रूझ किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले, तर त्यातील प्रत्येक हालचालीचा डेटा आयएनएस ध्रुव भारतीय नौदलाला रिअल-टाइममध्ये म्हणजे ताबडतोब प्रदान करेल, ज्यामुळे भारताला भविष्यातील धोक्यांचा सामना करणे सोपे जाईल.
अरबी समुद्रातील 'टेक्निकल वॉर'
सध्या अरबी समुद्र हे केवळ सागरी क्षेत्र राहिलेले नसून या भागातील माहिती गोळा करण्याची एक मोठी शर्यत सुरू झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात 16 एप्रिल रोजी होणाऱ्या शांतता चर्चेची जगात चर्चा होत असतानाच, दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये हे 'सायलेंट वॉर' सुरू आहे. आयएनएस ध्रुवची तैनाती ही पाकिस्तानसाठी मोठी मनोवैज्ञानिक आणि तांत्रिक हार मानली जात आहे. भारतीय नौदलाची ही सतर्कता दर्शवते की, शेजारील देशाच्या कोणत्याही हालचालीवर कडक नजर ठेवण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे.