Anuradha Paudwal on LGBTQ+ Community: प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आणि बिनधास्त मतं मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुराधा पौडवाल यांनी एका पॉडकास्ट दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठा वाद सुरू झाला आहे. या पॉडकास्टमध्ये त्यांना लग्न आणि कुटुंबाच्या रचनेबाबत समाजात बदलत चाललेल्या विचारसरणीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आपले मत मांडताना पद्मश्री पुरस्कार विजेत्या गायिकेने पारंपरिक विचारसरणीचे समर्थन केले. पूर्वीच्या काळी केवळ पुरुष आणि स्त्रीमधील नाते, विवाह आणि त्यातून निर्माण होणारे कुटुंब याच गोष्टींना समाजात सामान्य मानले जात होते, असे त्या म्हणाल्या. मात्र, सध्याच्या बदलत्या प्रवाहात लग्नसंस्थेमधील पूर्वीसारखी पवित्रता उरलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
LGBTQ+ समुदायाबाबत विचारले थेट प्रश्न
लग्नसंस्थेच्या ढासळत्या पवित्रतेमागे LGBTQ+ समुदायाला मिळालेले अधिकार हे देखील एक कारण असल्याचे मत अनुराधा पौडवाल यांनी यावेळी मांडले. समलिंगी आणि इतर पर्यायी नात्यांचा उल्लेख करत त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला की, 'हा समुदाय समाजहितासाठी नेमके काय योगदान देत आहे? मला हे जाणून घ्यायचे आहे की त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचे योगदान दिले जात आहे.' जोपर्यंत एखादा मुलगा आणि मुलगी कायदेशीररित्या लग्न करून नवीन कुटुंब सुरू करतात, तोपर्यंत सर्व गोष्टी योग्य पद्धतीने चालतात; परंतु या समुदायाच्या बाबतीत सातत्याने समोर येणाऱ्या गोष्टींमुळे समाजाचे काय भले होत आहे, असा सवाल त्यांनी केला.
लिव्ह-इन रिलेशनशिप आणि वाढत्या घटस्फोटांवर चिंता
याच मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी देशात वेगाने वाढणाऱ्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या (Live-in Relationship) ट्रेंडवरही तीव्र चिंता व्यक्त केली. अशा पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे कौटुंबिक रचना पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे सांगत, LGBTQ+ हक्कांवर चर्चा करण्यापूर्वी या गंभीर मुद्द्यांवर देशात बोलणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, सध्या समाजात घटस्फोटांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, काही खटले तर तब्बल 12 वर्षांपेक्षाही अधिक काळ न्यायालयात प्रलंबित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. या दीर्घकालीन वादात अडकलेल्या आई-वडिलांच्या मुलांवर होणाऱ्या भावनिक आणि मानसिक परिणामांकडे समाज पुरेशा गांभीर्याने पाहत आहे का, कारण हीच मुले हे सर्व पाहून चुकीच्या गोष्टी शिकत असतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
टीकेनंतर सोशल मीडियावर स्पष्टीकरण
या विधानांवरून चौफेर टीका होऊ लागल्यानंतर अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर स्पष्टीकरण जारी केले. त्यांच्या विधानाचा मूळ संदर्भ डावलून केवळ खळबळजनक बातमी तयार करण्यासाठी ते चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले, असा आरोप त्यांनी केला. आपल्या बचावात त्यांनी लिहिले की, 'माझ्या विचारानुसार या जगात प्रगती करण्यासाठी आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सुशिक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे आणि मी नेहमीच या विचाराचे समर्थन करते. आपल्या देशात प्रत्येकाला आपली मते आदरपूर्वक मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे.'