Iran Conflict Impact: इराण आणि संबंधित देशांमधील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता भारतीय बाजारपेठेत उमटू लागले आहेत. या युद्धाच्या सावटाचा थेट परिणाम भारताच्या कंडोम उत्पादन क्षेत्रावर झाला आहे. पेट्रोकेमिकल पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययामुळे या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असून, येत्या काही दिवसांत कंडोमच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कच्च्या मालाचा तुटवडा आणि आयातीवर परिणाम
भारतीय कंडोम उद्योगाचे वार्षिक मूल्य सुमारे 8,000 कोटी रुपये असून, देशात दरवर्षी 400 कोटींहून अधिक कंडोमचे उत्पादन केले जाते. या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या 'निर्जल अमोनिया'पैकी (Anhydrous Ammonia) तब्बल 86 टक्के अमोनिया सौदी अरेबिया, ओमान आणि कतारमधून आयात केला जातो. मात्र, आखाती देशांमधील तणावामुळे या आयातीवर परिणाम झाला आहे. सिलिकॉन ऑइल आणि अमोनिया यांसारख्या महत्त्वाच्या घटकांच्या किमतीत 40 ते 50 टक्क्यांनी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
उत्पादन खर्चात वाढ आणि पुरवठा साखळीतील अडथळे
कंडोम उत्पादनासाठी सिलिकॉन ऑइलचा वापर 'लुब्रिकंट' म्हणून, तर लॅटेक्स स्थिर ठेवण्यासाठी अमोनियाचा वापर केला जातो. सध्या या दोन्ही घटकांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. याव्यतिरिक्त पॅकेजिंगसाठी लागणारे पीव्हीसी (PVC) आणि ॲल्युमिनियम फॉइलचे दरही वधारले आहेत. यामुळे 'HLL Lifecare', 'Mankind Pharma' आणि 'Cupid Limited' यांसारख्या दिग्गज कंपन्यांना त्यांच्या ऑर्डर्स वेळेवर पूर्ण करणे कठीण झाले आहे. लॉजिस्टिकल अडथळ्यांमुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
किमती वाढल्यास मागणी घटण्याची भीती
भारतातील कंडोम बाजारपेठ ही प्रामुख्याने 'मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि कमी किंमत' (High-volume, Low-cost) या तत्त्वावर चालते. मात्र, उत्पादन खर्चात झालेली वाढ पाहता कंपन्यांना किमती वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. किमती वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसेलच, पण त्यासोबतच कंडोमच्या मागणीतही घट होण्याची भीती उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.