Anil Kapoor Rejected Cameo in Dhurandhar 2 : आदित्य धर दिग्दर्शित आणि बहुचर्चित 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून तो 19 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात येणार आहे. यामी गौतम आणि विकी कौशल यांच्या विशेष भूमिकेची चर्चा रंगली असतानाच, बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनी या चित्रपटाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. आदित्य धरने त्यांना या चित्रपटात एका छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती, मात्र त्यांनी ती नाकारली.
व्यावसायिक शिस्त आणि दिलेली कमिटमेंट
अनिल कपूर सध्या त्यांच्या आगामी 'सुबेदार' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी 'धुरंधर: द रिव्हेंज' नाकारण्यामागचे खरे कारण स्पष्ट केले. अनिल कपूर म्हणाले की, "आदित्य धर माझ्याकडे एका कॅमिओ रोलसाठी आला होता. मला त्याची कथा आणि भूमिका दोन्ही आवडले होते. मात्र, मी त्यावेळी आधीच इतर चित्रपट निर्मात्यांना माझ्या तारखा दिल्या होत्या. मी आज जो काही आहे, तो माझ्या प्रोफेशनलिजम आणि कमिटमेंटमुळे आहे. केवळ टॅलेंट तुम्हाला यशस्वी बनवू शकत नाही, तर तुम्ही दिलेला शब्द पाळणे महत्त्वाचे असते."
अनिल कपूर यांचे वैयक्तिक नुकसान
अनिल कपूर यांनी अत्यंत प्रांजळपणे कबूल केले की, या मोठ्या चित्रपटाचा भाग न होणे हे त्यांचे वैयक्तिक नुकसान आहे. त्यांनी सांगितले की, जर त्यांनी आधीच आदित्यला तारीख दिली असती आणि त्यानंतर कोणत्याही सुपरहिट दिग्दर्शकाने त्यांना विचारले असते, तरी त्यांनी आदित्यशी असलेली कमिटमेंट तोडली नसती. कोणाकडून तरी ऑफर आली म्हणून आधीची तारीख रद्द करणे हे अनप्रोफेशनल असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. "आदित्य धर एक प्रतिभावान दिग्दर्शक असून त्याचा हा चित्रपट नक्कीच दमदार असेल," अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
आदित्य धरसोबत भविष्यात काम करण्याची इच्छा
जरी 'धुरंधर 2' मध्ये अनिल कपूर दिसणार नसले तरी, भविष्यात आदित्य धरसोबत काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यांनी स्पष्ट केले की, 'धुरंधर 3' असो किंवा इतर कोणताही नवीन प्रोजेक्ट, त्यांना आदित्यसोबत काम करायला नक्कीच आवडेल. अनिल कपूर यांनी दाखवलेली ही व्यावसायिक शिस्त सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरत असून, तरुण कलाकारांसाठी हे एक मोठे उदाहरण मानले जात आहे.