UK New Prime Minister: युनायटेड किंगडममध्ये सत्तांतराची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली असून अँडी बर्नहॅम यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. लेबर पार्टीच्या नेतेपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर किंग चार्ल्स III यांनी त्यांना नवे सरकार स्थापन करण्याचे औपचारिक आमंत्रण दिले. यापूर्वी कीर स्टारमर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राजांकडे सुपूर्द केला होता. ग्रेटर मँचेस्टरचे महापौर राहिलेले 56 वर्षीय बर्नहॅम हे 2016 नंतर ब्रिटनचे 7 वे पंतप्रधान ठरले आहेत.
बकिंगहॅम पॅलेसची अधिकृत घोषणा
राजवाड्यात झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीबाबत बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, कीर स्टारमर यांनी राजांची भेट घेऊन पंतप्रधान आणि 'फर्स्ट लॉर्ड ऑफ द ट्रेझरी' या दोन्ही पदांचा राजीनामा सादर केला, जो महामहिम राजांकडून स्वीकारण्यात आला. यानंतर लगेचच बर्नहॅम यांनी औपचारिकपणे पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली.
स्थिर आणि जबाबदार प्रशासनाचे आश्वासन
गेल्या आठवड्यात झालेल्या पक्षीय निवडीत बर्नहॅम यांच्याविरोधात कोणीही उमेदवार नव्हता. हाऊस ऑफ कॉमन्स मधील लेबर पार्टीच्या 403 खासदारांपैकी तब्बल 379 खासदारांचे समर्थन बर्नहॅम यांना मिळाले होते. गेल्या 4 वर्षांत देश पाचव्या पंतप्रधानांचे नेतृत्व पाहत असताना, बर्नहॅम यांनी देशाला स्थिर आणि जबाबदार राजकारण देण्याचे वचन दिले आहे. मंत्रिमंडळाची घोषणा करून ते लगेचच कामकाजाला सुरुवात करणार आहेत.
'माझे काम पूर्ण झाले' – कीर स्टारमर
पंतप्रधानपदाचा त्याग करण्यापूर्वी '10 Downing Street' वरून देशवासीयांना संबोधित करताना 63 वर्षीय कीर स्टारमर म्हणाले, "माझे काम आता पूर्ण झाले आहे." देशाची सूत्रे बर्नहॅम यांच्याकडे सोपवताना आपण अत्यंत समाधानी असल्याचे सांगत त्यांनी नव्या पंतप्रधानांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. जुलै 2024 मधील सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीला मोठा विजय मिळवून देणाऱ्या स्टारमर यांना 'डाऊनिंग स्ट्रीट'वरून निघताना मंत्रिमंडळ आणि सहकाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात निरोप दिला.