Cheque Bounce Case: बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद कोर्टाने 9 जानेवारी 2026 रोजी हजर राहण्याचे आदेश देत तिला चेक बाउन्स प्रकरणात समन्स बजावले आहे. हे प्रकरण 2017 मधील एका लग्न समारंभाशी संबंधित आहे, जिथे अमिषा पटेलला चार गाण्यांवर परफॉर्म करण्यासाठी 11 लाख आगाऊ रक्कम देण्यात आली होती. परंतु ती कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही. तसेच तिने आयोजकांशी संपर्क साधला नाही, असा आरोप आयोजकांनी केला आहे.
पैशाचा वाद आणि तक्रार
ड्रीम व्हिजन इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा, मुरादाबाद येथील रहिवासी, यांनी 19 डिसेंबर 2017 रोजी न्यायालयात लेखी तक्रार दाखल केली होती. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, अमिषाला कार्यक्रमासाठी आगाऊ मानधन देण्यात आले, मात्र तिने परफॉर्मन्स केला नाही. त्यानंतर दोघांमध्ये समझोता झाला, ज्यात अमिषाने 14 लाख परत देण्याचे मान्य केले होते. त्यातील 6 लाख रोख आणि 2 लाखांचा चेक असा हप्ता तिने दिला, परंतु तो चेक बँकेत जमा केल्यानंतर बाउन्स झाला.
कोर्टात पुन्हा सुनावणी
चेक बाउन्स झाल्यानंतर आयोजकांनी अमिषा पटेल आणि तिच्या टीमशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पवन वर्मा यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने अमिषाला समन्स बजावले असून 9 जानेवारी 2026 रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.